ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २३ - दुष्काळग्रस्त लातूरला 'जलदूत एक्र्स्पेस'ने पाणी पोहोचवल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणे आणि नवी मुंबईकरांची पाणी समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचललं आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील पाणीसमस्या सोडवण्यासाठी सुरेश प्रभू यांनी रेल्वेसाठी वापरण्यात येणा-या धरणांमधून पाणी सोडण्याचा आदेश दिला आहे. सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
'ठाण्यातील रेल्वे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करुन त्यांना मदत करत आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही ठाणे महापालिकेला पाणीपुरवठा करुन मदत करणार आहोत', असं ट्विट सुरेश प्रभू यांनी केलं आहे. या धरणांमधील पाणी रेल्वेच्या गरजांसाठी वापरण्यात येतं. आता हे पाणी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना पुरवण्यात येईल असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे.
ठाण्यातील अनेक भांगात पाणीकपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आठवड्यातील 60 तास ठाण्याचा पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली आहे. अनेक ठिकाणी आठवड्यातील फक्त 4 दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. ठाण्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. ठाण्यात 30 तलाव आणि 500 बोअरवेल असतानाही गंभीर पाणीसमस्येला सामोरं जावं लागत आहे.
लातूरमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. त्यासाठी रेल्वे जलदूत एक्र्स्पेसच्या सहाय्याने पाणीपुरवठा करत आहे. मराठवाड्यामध्ये शतकातील भीषण दुष्काळ पडला असून मुख्य 11 धरणं पुर्णपणे कोरडी पडली आहेत.
Rail dam in Thane dist is helping Navi Mumbai by supplying water,we will do the same for Thane by supplying water to the Municipal Corpn— Suresh Prabhu (@sureshpprabhu) April 22, 2016