मुंबई : पावसाचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील पाण्याचे सर्व उपलब्ध साठे पिण्यासाठीच राखीव ठेवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता कर्जाची चिंताही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काही शहरे आणि गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे टंचाईचा आढावा घेतला आहे. मी स्वत: नाशिक, पुणे आणि पालघर येथे आढावा बैठका घेतल्या आहेत. काही शहरांमध्ये पाणीकपात करावी लागत आहे. राज्यात काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. कुठल्याही शेतकऱ्याला कर्जाची चिंता करण्याची गरज नाही. प्रसंगी शेतकऱ्यांच्या कर्जाचे, व्याजाचे पुनर्गठन, कर्जाच्या हफ्त्याची सोयीनुसार पुनर्रचना आदी उपाययोजना केल्या जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. (प्रतिनिधी)
पाण्याचे साठे पिण्यासाठीच राखीव
By admin | Published: July 02, 2014 4:20 AM