पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअरचे दोन्ही कालवे बंद करून अखेर गुरुवारी भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले. धरणात हंगामातील सर्वात मोठी आवकही नोंदविली गेली. धरणात सकाळपासून २८,७२९ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक होत होती. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ८५१ क्युसेक व निळवंडे धरणातून ८०० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू होता. पुढे हे पाणी निळवंडेतून ओझर वेअरमध्ये येते. तेथून प्रवरा नदीच्या पात्रातून जायकवाडीकडे झेपावते. मात्र, नगर जिल्ह्यातील नेत्यांनी हे पाणी जायकवाडी धरणाकडे येऊ नये म्हणून ओझर वेअरचे दोन्ही कालवे सुरू केले होते. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या नियमानुसार कालव्याद्वारे सिंचनासाठी वा जलभरण करण्यासाठी कालव्याद्वारे पाणी वळविता येत नाही. मात्र भंडारदऱ्याचे पाणी वळवून जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्यात येत होता. पाण्यावरील हा दरोडा ‘लोकमत’ने उजेडात आणताच जलसंपदा विभागात खळबळ उडाली आणि जायकवाडीच्या दिशेने प्रवरेच्या पात्रात ४६८ क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. ८० दलघमी पाण्याची आवक झाल्याची माहिती अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीच्या दिशेने
By admin | Published: July 31, 2015 1:08 AM