दत्ता थोरे/ विशाल सोनटक्के/ प्रताप नलावडे,लातूर, उस्मानाबाद, बीडलातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांत दुष्काळझळा प्रचंड जाणवत आहेत. तिन्ही जिल्ह्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. साई बंधारा आणि मांजरा धरण आटल्यामुळे साडेपाच लाख लोकसंख्येचे लातूर शहर ‘टँकर’भरोसे आहे. दुसरीकडे अंतर्गत पाईपलाईनची कामे प्रलंबित असल्याने निम्मे उस्मानाबाद शहर पाण्यासाठी वणवण फिरत आहे. बीड जिल्ह्यात लहान मोठे १४६ प्रकल्प असून त्यातील बहुतांश कोरडे पडले आहेत. जिल्ह्यात केवळ दीड टक्के पाणीसाठा असल्याने येत्या काळात पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. माळकुंजी येथील तेरणा निम्म प्रकल्प आणि पोहरेगाव येथील बंधाऱ्यातून दररोज ५० टँकरने ३० लाख लिटर पाणी आणून लातुरातील जलशुद्धीकरण केंद्र आणि तीन जलकुंभात साठविले जात आहे. जिल्ह्यात प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. एकूण १४१ प्रकल्पांपैकी१२० कोरडे आहेत. पाणीसाठा ६९१ द.ल.घ.मी आहे. फक्त २.२०२ दलघमीच पाणी वापरायोग्य आहे. त्यामुळे आता एप्रिल आणि मे हे दोन महिने काढायचे कसे? या चिंतेत जिल्हा आहे. मांजरा आणि साई या दोन्ही धरणस्थळी ३० फुटांचे चर घेण्यात आले आहेत. या चरांमध्ये झऱ्याच्या रुपात आलेले पाणी लातूर शहरासाठी टँकरने आणले जात आहे. शहरात जे सहा जलकुंभ आहेत, त्याद्वारे होणारा पाणीपुरवठा कुणी विस्कळीत करू नये, मोर्चा आणि आंदोलने करून जलकुंभातील पाणी पळवून नेऊ नये, किंवा त्याची नासाडी करू नये, यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कलम १४४ लागू केले आहे. लातूर शहरात मनपाचे प्रत्येक प्रभागात दोन प्रमाणे ३५ प्रभागांत ७० टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. सात दिवसांतून २०० लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाला देण्याचा प्रयत्न आहे.उस्मानाबादला निधीची गरजउस्मानाबाद जिल्ह्यातील १९४ गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला मराठवाड्याला द्यावयाच्या २३.६६ टीएमसी पैकी कृष्णा पाणीतंटा लवादाने मंजूर केलेले पहिल्या टप्प्यातील ७ टीएमसी पाण्यासाठीच्या कामाला ठोस निधी द्यावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला तातडीने निधी देऊ, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाडादौऱ्यात दिला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने तयार केलेला यासंबंधीचा प्रस्ताव प्रस्ताव नियोजन विभागाकडूनवित्त विभागाकडे गेला आहे. शासनाने निधीची ठोस तरतूद केल्यास ७ टीएमसी पाण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. त्यामुळे परंडा, भूम तालुक्यासह वाशी आणि उस्मानाबाद तालुक्यातील काही गावांतील टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील १९४ गावे आणि सात वाड्यांसाठी जवळपास २७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २५६ विंधन विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तरीही नागरिकांचे हाल सुरूच आहेत. परंडा शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर सीना-कोळेगाव हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, तीन वर्षांपासून या प्रकल्पात ठणठणाट आहे. बिंदुसरा धरण कोरडे पडले असून बीड शहराला आता माजलगाव धरणावरच तहान भागवावी लागत आहे. तथापि, या धरणात अवघा ३० दिवस पुरेल इतकाच साठा आहे. जिल्ह्यातील १२०० हातपंपही कोरडे पडले आहेत.विहिरीतून तळाला गेलेले पाणी उपसण्यासाठी गेलेल्या लहान मुलांचा आणि वृद्धांसह तरूण महिलांचाही बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गेवराई तालुक्यात अवघ्या दीड महिन्यात चार बळी गेले आहेत. मिळेल ते पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
पाण्यासाठी दाहीदिशा
By admin | Published: March 22, 2016 4:09 AM