संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्पपावसाने हिवाळ्याच्या सुरूवातीलाच राज्यातील ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण केली. पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी शासनाने ७४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावर्षी राज्यावर पाऊस रूसला. परिणामी, हिवाळ्याच्या सुरूवातीपासूनच पाणीटंचाईचे ढग गडद झाले. अगोदरच विविध संकटांमधून जात असलेल्या सरकारसमोर आता पाणीटंचाईनेही नवे संकट निर्माण केले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांची आखणी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आवश्यक तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानुसार टंचाईग्रस्त ५७0 गावांमध्ये एकूण ७४८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय १५३ आणि खासगी ५९५ टँकरचा समावेश आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या लेखी कोकण व नागपूर विभागातील एकाही गावात पाणीटंचाई नाही. अमरावती विभागातील केवळ बुलडाणा जिल्ह्यातील तीन गावांमध्ये १0 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक तिव्रता मराठवाड्यात जाणवत असून, तब्बल ४२२ गावे पाणीटंचाईत होरपळून निघत आहे. ४२२ गावांमध्ये ५६४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५९ गावांत ८0 टँकर, परभणी ३१ गावांत ४२ टँकर, हिंगोली तीन गावांत दोन टँकर, नांदेड ६३ गावांत १0६ टँकर, उस्मानाबाद १0३ गावांत १२0 टँकर, लातूर ३८ गावांत ५३ टँकर, जालना दोन गावांत दोन टँकर आणि बीड १२३ गावांत १५९ टँकर, अशी मराठवाड्यातील हिवाळ्यातच भयावह स्थिती आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व अहमदनगर या चार जिल्ह्यातील ९३ गावांत ११३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या चार जिल्ह्यातील ५२ गावांत ६१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. *ग्रामविकास मंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच सर्वाधिक टंचाई राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांचा गृह जिल्हा असलेल्या बीडमधील सर्वाधिक अर्थात १२३ गावांत पाणीटंचाई असून येथे तब्बल १५९ टँकर सुरू आहेत. १२३ गावे आणि १0९ वाड्यांमधील पाणीटंचाईची दाहकता कमी करण्यासाठी २४ शासकीय व १३५ खासगी अशा एकूण १५९ टँकरने नागरिकांची तहान भागविली जात आहे.
राज्यात ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई
By admin | Published: December 04, 2015 2:36 AM