पुणे : पावसाळा आणखी किमान दीड महिना दूर असताना महाराष्ट्रातील जलसाठा जेमतेम २० टक्के शिल्लक राहिला आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या २० हजार गावांसह राज्यातली अनेक गावे, तांडे पाण्याच्या शोधात रात्रंदिवस भटकू लागली आहेत. उष्णतेच्या तीव्र लाटेत जलसाठ्यांच्या बाष्पीभवनाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे धरणांमधले पाणी वेगाने आटत असून उपयुक्त जलसाठा फक्त २०.०९ टक्के आहे. मराठवाड्याची स्थिती भयानक असून औरंगाबादमध्ये जेमतेम ५.२८ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर विभागातील पाणीसाठा ११.०९ टक्के तर पुणे विभागातील पाणीसाठा २४.३९ टक्के आहे. तुलनेने कोकणात पाण्याची स्थिती बरी असून तेथे ४१.२९ टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील लहान, मोठ्या व मध्यम धरणांत १४४४.१३ अब्ज घनफूट उपयुक्त पाणीसाठा असतो. त्यापैकी तब्बल १०२७.२९ टीएमसी पाणी मोठ्या धरणांत साठते. यापैकी ४३९.४० टीएमसी म्हणजेच ३० टक्के पाणी पुणे विभागात आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा आज १००.६२ टीएमसी होता. औरंगाबाद व नाशिकच्या मोठ्या धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता अनुक्रमे १५९.०८ आणि १३२.०८ टीएमसी आहे. सध्या ४.३६ टीएमसी औरंगाबादेत तर २२.४१ टीएमसी पाणी नाशकात आहे. राज्याचा उपयुक्त पाणीसाठा १,४४४.१३ अब्ज घनफूट असून, सध्या २९०.०८ अब्ज घनफूट शिल्लक आहे.पुढच्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मराठवाड्यात ४१ व ४२ आणि विदर्भात ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमान आहे. तीव्र तापमानामध्ये बाष्पीभवनाचा वेगही प्रचंड असतो. त्यामुळे पाणीसाठ्यात वेगाने घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता
विभाग | उपयुक्त साठा क्षमता | आजचा साठा (कंसात टक्केवारी) | २०१८ (टक्के) | २०१७ (टक्के) | २०१६ (टक्के) |
अमरावती | १४८.०६ | ३६.११(२४.३९) | १९.२० | ३४.११ | ११.८१ |
औरंगाबाद | २६०.३१ | १४.०६ (५.२८) | ५०.१९ | ५५.०८ | ३५.९२ |
कोकण | १२३.९४ | ५१.१७ (४१.२९) | १७.०८ | १९ | १२.५७ |
नागपूर | १६२.६७ | १८.०३ (११.०९) | ३५.२८ | ३१.७४ | १२.७३ |
नाशिक | २१२ | ४० (१८.८७) | ३८.०८ | २७.०५ | १५.७१ |
पुणे | ५३७.१२ | १३१.०१ (२४.३९) | ३०.८९ | ३४.१२ | ०.९९ |
एकूण | १४४४.१३ | २९०.०८ (२०.०९) | ३३.०८ | ३१.४१ | १३.६५ |
(आकडेवारी टीएमसीमध्ये)
फक्त धरणसाठ्याची आकडेवारी लक्षात घेणे चुकीचे ठरेल. कारण मोठी शहरे आणि काही गावांचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्र आजही भूजलावरच अवलंबून आहे. या भूजलसाठ्याची स्थिती काय आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे तहान टँकरवरच भागवावी लागेल. त्यादृष्टीने काटेकोर नियोजन हवे. - डॉ. दि. मा. मोरे, माजी जलसंपदा सचिव