मधुकर ठाकूर
उरण :
दिघोडे बार्टर व्यवस्थेतून पाणी देण्यास सिडकोने नकार दिल्याने १ जानेवारीपासून आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय उरण एमआयडीसीने जाहीर केला आहे. यामुळे उरणकरांवर नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. उरण तालुक्यातील दिड लाख लोकसंख्या, २० ग्रामपंचायत हद्दीतील गावे,उरण नगरपरिषद, आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्र मिळून एकूण ६८ ग्राहकांसाठी एकमेव असलेल्या रानसई धरणातुन एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे.
वाढती लोकसंख्या आणि वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी १० एमएलडी इतक्या पाण्याची गरज भासते.रानसई धरणातील पाणी नागरिकांना पाऊस पडेपर्यंत पुरवठा करावा लागत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून एमआयडीसीकडून सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतुन दररोज ५-६ एमएलडी पाणी घेतले जाते.शिवाय काही प्रमाणात गरजेनुसार पाणी कपात ही केली जाते.
यावर्षी मात्र सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतुन १ जानेवारीपासून दररोज ५-६ एमएलडी पाणी देण्यास नकार दिला आहे.सिडकोने घेतलेल्या असहकाराच्या भुमिकेमुळे एमआयडीसीची चांगलीच पंचाईत झाली आहे.पावसाळ्यापर्यत उरणकरांना पाणी पुरवठा कसा करायचा या विवंचनेत असलेल्या एमआयडीसीने अखेर तीन दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असा तीन दिवस पाणी पुरवठा रात्री १२ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे.तशा सुचनाही एमआयडीसीने ग्राहकांना दिल्या असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी दिली. मात्र सिडकोच्या असहकार्याच्या भुमिकेमुळे उरणकरांवर नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.