पारवडी : पारवडी (ता. बारामती) येथील परिसरात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली; मात्र पारवडी परिसरातील केवळ एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. परिसरातील इतर ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असते, तर सुरुवातीला पडलेल्या पावसाचे पाणी साठून या भागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. मात्र, जलयुक्तच्या अपुऱ्या कामांमुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले आहे. यामध्ये जलसंपदा विभाग, कृषी विभाग तसेच लघु पाटबंधारे विभाग यांनी संयुक्तपणे ओढाखोलीकरण, नवीन बंधारे बांधणी, अशी कामे केलेली आहेत. पारवडीत जलयुक्त शिवार अभियान राबविताना केवळ गावातील एकाच ओढ्याचे खोलीकरण करण्यात आल्याने इतर परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांचेदेखील हाल होत आहेत. पाणीटंचाईमुळे शेती पडीक आहे. खरीप हंगामात थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी तसेच जनावरांची चारापिके घेण्यात आली आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांनी दररोज पाणीउपसा करून बंधारे कोरडे केल्यामुळे गावडे, गवंडवस्ती, दरेवस्ती तसेच सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील पिके जळून चालली आहेत. सिद्धेश्वर निंबोडी शेतकरी तसेच गावडेवस्ती येथील ग्रामस्थांनी अपुरे खोलीकरण, नवीन बंधारे बांधणी करण्यात आली असल्याने त्याचा आम्हा शेतकरीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पारवडीचे ग्रामसेवक शहानूर शेख यांच्याशी संपर्क साधला असता येत्या १५ सप्टेंबरपासून राहिलेली ओढाखोलीकरण नवीन बंधारे बांधणी, अशी कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, जळून चाललेल्या पिकांची माहिती विचारण्यासाठी कृषी सहायक जे. एन. कुंभार यांना संपर्क साधला असता ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे, त्यांना प्रधानमंत्री कृषी पीकविमाअंतर्गत नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले. परंतु, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पीकविमा काढूनही त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. (वार्ताहर)>पाणी बंधाऱ्यात : विहिरींनी गाठला तळएक ओढा खोलीकरण व नवीन बंधारे बांधणी करण्यात आलेली असल्यामुळे त्याचा फायदा केवळ गावातील ३० टक्के परिसराला झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच, नवीन बंधारे नसताना ओढ्याचे पाणी प्रवाह सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील तलावात सहजपणे जात होते. सध्या याच ओढ्याचे खोलीकरण नवीन बंधारे बांधणीमुळे पावसाचे व खडकवासला कालव्यांमधून मिळणाऱ्या आवर्तनातील पाणी बंधाऱ्यात साठते.
अपुऱ्या कामांमुळे पाणीटंचाई
By admin | Published: August 25, 2016 1:42 AM