पुणे : पावसाने जून महिना कोरडा गेल्याने वेल्हा, मुळशी व मावळ तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने १२८ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे झपाट्याने टँकर कमी होऊन आता ३५ टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू आहे. तोही बारामती, दौैंड व पुरंदर या तीन तालुक्यांतच.त्यात सर्वाधिक २० टँकर बारामती तालुक्यात असून, पुरंदर १० व दौैंड तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी ५ जूननंतर जिल्ह्यात मॉन्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६०.०६ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. या वर्षीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुळात जूनच्या सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नाही. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, जूनमध्ये फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवत होती. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात १४७ टँकर सुरू होते. जून महिन्यात १२८ टँकरने ८४ गावे ८१७ वाड्यावस्त्यांवर सव्वातीन लाख लोकांना पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जून व जुलै या दोन महिन्यांची सरासरी पावसाने ओलांडली. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी झाली. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली असून, आणखी दोन तालुके त्या मार्गावर आहेत. परिणामी टँकर झपाट्याने कमी झाले आहेत. १२८ वरून आता ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दौंड तालुक्यात ५ टँकर सुरू असून, तेही पुढील काही दिवसांत बंद होतील. त्यामुळे बारामती व दौैंड वगळता जिल्हा टँकरमुक्त होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांसह सोलापूर जिल्हा उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे.पुणे शहर व धरणक्षेत्रात गेल्या दहा दिवसांत मुसळधार पाऊस होत आहे. तेथील पावसाचे पाणी उजनीत गेल्या आठ दिवसांपासून येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत दररोज वाढ होत आहे. वाढलेल्या या पाण्यामुळे मका, कडवळ, पिके पाण्याखाली गेली आहेत. दररोज पाणी वाढत असल्याने उजनीलगतच्या भिगवण ते हिंगणगाव पट्ट्यातील शेतकरी आनंदी झाला आहे.
पाणीटंचाई मिटली; शेतीसाठी विसर्ग
By admin | Published: August 10, 2016 1:42 AM