शौकत शेख,
डहाणू- सूर्या अंतर्गत येणाऱ्या धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणू तालुक्याच्या पूर्व भागांत गेल्या एप्रिलपासून पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर डहाणूच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळशेत, शेलटी, कातकरीपाडा, गावठाणपाडा, ओवलीपाडा, तोरणपाडा, सापाटीपाडा येथे गेल्या दोन तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी नसल्याने येथील शेकडो आदिवासी कुटुंबांवर ओहोळ, नदी, नाळ्यातून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. मात्र अनेक वेळा तक्रार करूनही पंचायत समिती प्रशासन पाण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने येथील आदिवासींना पाण्यासाठी दुसऱ्या गावात स्थलांतर होण्याची वेळ आली आहे.डहाणूच्या कवडास, धापणी, साखरे धरणातून गेल्या अनेक वर्षापासून वसई, विरार, भार्इंदर व इतर शहरातील कोट्यवधी नागरीकांची तहान भागविली जाते. परंतु शासन व सुस्त प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे येथील आदिवासी भूमिपूत्रांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. डहाणू तालुक्याच्या मुंबई, अहमदाबाद महामार्गाच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले गाव, खेडे, पाडे आहेत. वरील धरणांसाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी शासनाला कवडीमोल भावाने जमिनी देऊन आपले योगदान दिल्याने आज अनेक मोठमोठ्या शहरांतील कोट्यवधी लोकांची तहान भागविली जात आहे. मात्र ज्यांच्या जमिनीवर तसेच आदिवासी उपयोजनेतून ४८० कोटी रुपये खर्च करूनही धरणे उभी आहेत. त्या धरणांतून या गोरगरीब आदिवासींना पाण्याचा थेंबही मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा नदी, नाळ्यातून गढूळ व दूषित पाणी पिऊन वर्षभर विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.