ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १९ - जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्यानंतरही पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसणे किंवा गावांमध्ये कोणत्याही प्रकारही योजना नसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्याच लागत आहे. प्रशासनाच्या उदासिन धोरणांमुळे काही गावातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, पिंपळखेड येथे पाणीटंचाई दूर झाली नसून प्रशासनाने टँकर बंद केल्यामुळे पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून टँकर सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. यासोबतच चिखली तालुक्यातील
सातगाव मार्गावर असलेल्या छोट्या छोट्या गावांमधील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच परराज्यातून जिल्ह्यात अनेक नागरिक येतात. मोकळ्या जागेत राहुट्या टाकून महिनोंमहिने वास्तव्य करतात. त्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणीपुरवठ्याच्या फुटक्या व्हॉल्वमधून पाणी भरण्यात येते. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.