मुंबई : सध्याच्या भीषण जलसंकटावर पाण्याची बचत हाच केवळ एकमेव उपाय असल्यामुळे त्यासंदर्भातील जनजागृती आणि जलबचतीची प्रत्यक्ष कृती करणारे ‘लोकमत’ जलमित्र अभियान सोमवार, दि. १६ मेपासून दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत असून, या सप्ताहात हॉटेल्समध्ये ग्राहक ज्या ठिकाणी बसून खानपान करतात तेथे ‘जलमित्र’चे टेन्टकार्ड ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत टेन्टकार्डच्या माध्यमातून जलसाक्षरता प्रभावीपणे विकसित करण्याचा उद्देश आहे.सहा आठवड्यांच्या जलमित्र अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये हॉटेलचालक, कर्मचाऱ्यांना जलबचतीचा संदेश देऊन त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्यात आले. हॉटेल्समध्ये पाणी साठविण्यासाठी ड्रम्स देऊन तेथे जलबचतीचे कार्य सुरू झाले. आजवर राज्यभरात हजारो लिटर्स पाणी या मोहिमेंतर्गत साठविले गेले असून, हॉटेलचालकांनी त्याचा साफसफाई आणि बागांसाठी पुनर्वापरही केला आहे.दुसऱ्या सप्ताहामध्ये ग्राहकांच्या जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. ग्राहक ज्या टेबलवर बसून उपहार किंवा भोजन घेतात तेथे टेन्टकार्ड ठेवून त्यांना पाणी वाचविण्याचा संदेश दिला जाईल. हॉटेलमध्ये ग्राहक जेव्हा पेयजलाची मागणी करतो तेव्हा वेटर्सकडून त्यांना पूर्ण ग्लास भरून पाणी दिले जाते.ग्राहक बऱ्याचदा ग्लासभर पाणी घेत नाही. त्यामुळे अर्धा ग्लास वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन आवश्यक तेवढेच पाणी मागा आणि ग्राहकांना देण्याचा संदेश या टेन्टकार्ड्सवर आहे. याशिवाय मोफत मिळणाऱ्या पाण्याची किंमत असल्याची जाणीवही ग्राहकांना करून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)‘जलमित्र’चे उपक्रममंगल कार्यालयात पाण्याचा वापर जास्त होतो. मात्र, पाणी वाया जाण्याचे प्रमाणही जास्त असते. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानापासून प्रेरणा घेऊन सातारा जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालय मालकांनी पाणीबचतीसाठी नानाविध प्रयोग राबविले आहेत.दैनंदिन व्यवहारात पाण्याचा वापर हॉटेलमध्ये जास्त होतो; म्हणून त्या घटकामध्ये यासंबंधी प्रबोधन व्हावे या हेतूने ‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूर शहरातील विविध हॉटेल्सना भेटी देत पाणीबचतीबाबत प्रबोधन केले. या उपक्रमास शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला येथे ‘जलमित्र अभियान’ला शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून प्रतिसाद लाभत आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा त्यांना संचय करता यावा, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने शनिवार, १४ मे रोजी शहरातील काही हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना पाण्याचे ड्रम वितरित करण्यात आले. >पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरविणे आता काळाची गरज झाली आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी बचतीसाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेले जलमित्र अभियान कौतुकास्पद आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व हे अभियान चळवळ व्हावी. आतापर्यंत कालव्यांव्दारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी ३० ते ५० टक्के वाया जात होते. हे लक्षात घेऊनच भविष्यात सिंचनासाठी पाणी कालव्यांऐवजी बंद पाईपलाईनने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सूक्ष्मसिंचन धोरण राबविणे, पाण्याचा पुनर्वापर हीदेखील काळाची गरज आहे. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री.
टेन्टकार्ड्सच्या माध्यमातून जलसाक्षरता
By admin | Published: May 16, 2016 2:19 AM