नवी दिल्ली : धरणांतील पाणीपातळीत चिंताजनक घट झाल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सहा राज्यांना पाण्याचा वापर विवेकाने करण्याचा सल्ला जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी तमिळनाडूसाठी सल्ला जारी करण्यात आला असून, याच प्रकारे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मागच्या आठवड्यात इशारावजा सल्लापत्र जारी करण्यात आले, असे केंद्रीय जल आयोगाचे (सीडब्ल्यूसी) सदस्य एस.के. हलदर यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांतील जिवंत साठ्याची सरासरी आकडेवारीपेक्षा जलशयांतील पाणीपातळी २० टक्क्यांवर आल्याने केंद्र सरकारकडून उपरोक्त राज्यांना दुष्काळाबाबत इशारावजा सल्ला जारी करण्यात आला. घटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जोवर पाणीपातळीत वाढ होत नाही, तोवर धरणांत उपलब्ध पाण्याचा पिण्यासाठीच वापर करावा, असा सल्ला या राज्यांना देण्यात आला आहे.
देशभरातील मोठ्या ९१ जलशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे केंद्रीय जल आयोगाकडून आकलन केले जाते. केंद्रीय आयोगाने गुरुवारी जारी केलेल्या पाणीसाठा आकडेवारीनुसार आजघडीला ३५.९९ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. या जलशयांच्या एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षा हे प्रमाण २२ टक्के आहे. या ९१ जलाशयांची पाणीसाठवण क्षमता एकूण १६१.९९३ अब्ज घनमीटर आहे. ९ मे रोजी संपलेल्या आठवड्यातील उपलब्ध पाणीसाठा २४ टक्के होता. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांतील पाणीटंचाईची स्थिती गंभीर दिसते.गुजरात, महाराष्ट्रात ४.१० अब्ज घनमीटर जिवंत पाणीसाठा
पश्चिम विभागातील गुजरातेत १० आणि महाराष्ट्रात १७ जलाशय आहेत. या जलशयांची जिवंत पाणीसाठ्याची एकूण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. तथापि, १६ मेपर्यंत या जलाशयांतील जिवंत साठा ४.१० अब्ज घनमीटर होता. एकूण जिवंतसाठ्यापेक्षा हे प्रमाण १३ टक्के आहे. मागच्या वर्षात या २७ जलाशयांतील पाणीसाठ्याचे प्रमाण १८ टक्के, तर मागील दहा वर्षांत २२ टक्के होते.
दक्षिण भागात आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे. या राज्यांतील ३१ जलाशयांतील जिवंत साठ्याची एकूण क्षमता ५१.५९ अब्ज घनमीटर आहे. केंद्रीय जल आयोगाच्या पाहणीनुसार फक्त ६.८६ अब्ज घनमीटर जिवंत साठा आहे. हे प्रमाण एकूण जिवंत साठ्याच्या १३ टक्के आहे.