सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यात या वर्षी पाऊस चांगला झाला असला, तरी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा सुमारे १४ टक्के कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी धरणासहउल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्णातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांसह एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण लघुपाटबंधारे विभागाने लागू केले आहे. यामुळे सुमारे एक हजार ४८० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत होत आहे. वाढत्या लोकसंख्येस पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची साठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे पाऊस जास्त झाला असला तरी पाणीकपातीचे संकट मात्र राहणार, यात शंका नाही. यामुळे बारवीसह उल्हास नदीतून ठाणे मनपासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर या महापालिका तर अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांच्या एका दिवसाच्या सुमारे ७८० एमएलडी तर एमआयडीसीची सुमारे ७०० एमएलडी पाण्याची बचत करण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र धरणात या वर्षी अल्प पाणीसाठा झाला आहे. तर बारवी धरणात १७०.२० पैकी गुरुवारपर्यंत १०३.४६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५७.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आदींद्वारे सुमारे एक हजार ४८० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जातो. या पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक महापालिकेने त्यांचा एक दिवसाचा पाणीपुरवठा बंद करून बचतीचे धोरण स्वीकारले आहे. एमआयडीसीसाठी वापरण्यात येणारा सुमारे ४९० एमएलडी म्हणजे ७० टक्के व उद्योगधंद्यावरील प्रक्रियेचा सुमारे २१० एमएलडी म्हणजे ३० टक्के पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवून त्याची बचत केली जात आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
ठाण्यावर पाणीबाणीचे सावट
By admin | Published: February 13, 2015 1:38 AM