मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन व भत्त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात उतरलेले सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केले. शिवाय दोन दिवसांत सरकारने मागण्यांबाबत गंभीर दखल घेतली नाही, तर बुधवारपासून शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.समितीच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही मान्य होत नसल्याने राज्यातील सर्व कर्मचारी १ मार्च ते ४ मार्चदरम्यान काळ््या फिती लावून काम करत होते. मात्र तरीही शासनाने दखल घेतली नसल्याने हे आंदोलनाची धार अधिक तीव्र करत असल्याचे समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांडगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्य शासनाने कृष्णा, तापी, विदर्भ, गोदावरी-मराठवाडा आणि कोकण खोऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्तीवेतन, भत्यांची जबाबदारी घेतलेली आहे. या निर्णयाप्रमाणेच शासनाने १९७६ ला स्थापन झालेल्या जीवन प्राधिाकरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा. २००५ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णयही झाला. मात्र शासनाच्या चालढकलीमुळे त्यावर अद्याप कुठलीही प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.शासनाला इशारा म्हणून १ ते ४ मार्चदरम्यान कर्मचाऱ्यांनी काळ््या फिती लावून काम केले. त्यानंतर सोमवारपासून कामबंद आंदोलन करत सर्व कर्मचारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान,काम बंद केले असले, तरी पाणी पुरवठा सुरळीत ठेवत असल्याचे समितीने स्पष्ट केले. मात्र दोन दिवसांत शासनाने मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर बुधवारपासून पाणी पुरवठाही बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)>आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकसमितीने केलेल्या जोरदार आंदोलनानंतर पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. शिवाय कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. असे असले, तरी केवळ आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नाही. त्यामुळे मंगळवारी निर्णय झाला नाही, तर बुधवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा लांडगे यांनी दिला आहे.
उद्यापासून राज्याचा पाणीपुरवठा बंद!
By admin | Published: March 07, 2017 5:03 AM