भोर : पसुरे (ता. भोर) गावांतर्गत असलेल्या कुरण गावठाण आणि रोहिदासनगर व लक्ष्मीनगर येथे लोकवर्गणी व १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ८ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक वर्षे टॅँकरग्रस्त असलेल्या तीनही वाड्यावस्त्यांची पाणीटंचाई कायमस्वरूपी हटणार असून, गाव टॅँकरमुक्त होणार आहे. भाटघर धरण भागातील पसुरे येथील गावांतर्गत असलेले कुरण गावठाण, रोहिदास व लक्ष्मीनगर या वाड्यावस्त्या असून, सुमारे ४५० लोकसंख्या आहे. मात्र, गावात कोणतीच पाणीपुरवठा योजना नसल्याने पावसाळ्यात झऱ्याचे पाणी, तर उन्हाळ्यात तीन किलोमीटरवरून भाटघर धरणातून पाणी आणावे लागत होते. यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल सुरू होते.मात्र, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांच्या मदतीने सरपंच चंद्रकांत खोपडे यांच्या पुढाकाराने सदर पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वाड्यावस्त्यातील नागरिकांनी लोकवर्गाणीतून २ लाख जमा केले असून, अजून दीड लाख रुपये, असे ३.५० लाख रु. जमा केले आहेत. >भाटघर धरणावरून ११४० मीटरची अडीच इंची पीव्हीसी पाइपलाइन करून पाणी घेतले जाणार आहे. वितरण व्यवस्था १८४० मीटरची आहे. सिनटेक्सची टाकी वापरली जाणार आहे. या कामाला सुरुवात झाली असून, काम पूर्ण झाल्यावर कुरण गावठाण, रोहिदासनगर व लक्ष्मीनगर या वाड्यावस्त्यांचा टॅँकर बंद होऊन येथील टंचाई कायमस्वरूपी बंद होणार आहे.टॅँकर नाकारल्याने पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय झाल्याने गावातील टंचाई हटली. पसुरे गावातील कुरण गावठाण, रोहिदास, लक्ष्मीनगर येथे पाणीटंचाई असल्याने टॅँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, पाहणीत उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी टॅँकर नाकारला आणि धरणावरून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. पाणी परवानगी व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात
By admin | Published: June 13, 2016 1:40 AM