ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे तिच्या दुरुस्तीचे काम मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे वर्तकनगर, म्हाडा वसाहत, ज्ञानेश्वरनगर, भीमनगर आणि माजिवडा आदी परिसरांतील सुमारे १० हजार कुटुंबीयांना गेल्या दोन दिवसांत पाणी मिळाले नाही. ही दुरुस्ती गुरुवारपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्याच्या माजिवड्यापासून ते मुलुंडपर्यंतच्या सुमारे पाच किलोमीटर कामाचा यात समावेश आहे़चार महिन्यांपूर्वी वर्तकनगर भागातून जाणारी १८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती. त्या वेळी सुमारे ३०० घरांमध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले होते. तर पाच हजार कुटुंबीयांना पाण्याचा मोठा फटका सहन करावा लागला होता. त्या वेळीही दोन दिवस अचानक झालेल्या या घटनेने अनेकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. त्यानंतरही किमान दोन वेळा जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या होत्या. वर्तकनगर, भीमनगर भागात सहा ठिकाणी, ज्ञानेश्वरनगर दोन, काजूवाडी एक आणि माजिवड्यात दोन ठिकाणी या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम असल्यामुळे मुंबई महापालिकेने १३ जानेवारीपासून ही दुरुस्ती सुरू केली आहे. या जलवाहिनीतून मुंबईप्रमाणेच ठाण्यातील नवीन म्हाडा वसाहत, वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या इमारत क्रमांक ५१ ते ६८ आणि १४ व १६ या १० इमारतींसह म्हाडा वसाहत आणि शिवाईनगरच्या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी सहा इंचांच्या दोन जोडण्या घेतलेल्या आहेत. ठिकठिकाणच्या गळतीमुळे मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बाळकुम ते मुलुंडपर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या दुरुस्तीमुळे ही वाहिनी पूर्णपणे बंद ठेवलेली आहे. त्यामुळे मंगळवारपासून माजिवडा, भीमनगर, नवीन म्हाडा वसाहत, जुनी म्हाडा वसाहत, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी भागातील सुमारे १० हजार नागरिकांना पाणीच न मिळाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दुरुस्ती बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मुरलीधर भोये यांनी ‘लोकमत’ला दिली.
१० हजार कुटुंबांवर पाणीबाणी
By admin | Published: January 15, 2015 5:08 AM