लोणावळा, दि. 30 - लोणावळा शहर व परिसरात मंगळवारी (29 ऑगस्ट) धुव्वाधार पाऊस झाला. 24 तासांत शहरात 221 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन झाले. पाऊस थांबल्याने परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असून नागरिकांना काहिसा सुटकेचा निश्वास टाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या वळवण धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे ऐन गणेशोत्सवात वळवण, वरसोली, मळवली, जवळकरवस्ती, खत्री फार्म या भागासह मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुराचा तडाखा बसणार अशी साधारण शक्यता निर्माण झालेली असताना पावसाने घेतलेली विश्रांती सर्वांकरिता दिलासादायक ठरली आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील रस्ते बंद झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक मंगळवारी सायंकाळ बंद करण्यात आली होती. ती रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आली. वलवण धरणातून डक्ट लाईनच्या माध्यमातून शक्य तेवढे पाणी खोपोली भागात सोडत धरणाची पातळी कमी करण्याचे प्रयत्न टाटा कंपनी प्रशासनाकडून सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास शहराच्या काही भागाला पूर्ण विळखा बसू शकतो, असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण मात्र सतर्क रहावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले आहे.
मावळात ढगफुटी होण्याची अफवा मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मावळ तालुक्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे संदेश मंगळवारी रात्रभर सोशल मीडियावरुन वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
पवना धरणाचा विसर्ग वाढविला पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यातच पावसाचा जोर वाढत राहिल्याने मंगळवारी रात्री अकरा वाजता धरणातून 7 हजार 500 क्युसेक्सने पाणी पवना नदीत सोडण्यात आल्याने शिवली पूल पाण्याखाली गेला तर बेबेडोअळ पुलाला पाणी लागले आहे. मावळातील वाडीवळे धरणातून 4 हजार 600, कासारसाई धरणातून 300 तर आंद्रा धरणातून 1 हजार 150 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने ग्रामीण भागातील व विशेषतः नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे. तसेच आपतकालिन स्थितीत मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.