मुंबई : ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात घरफोडी करायच्या. त्यात अटक होताच पोलिसांच्या चौकशीतून सुटण्यासाठी अन्नत्यागाचा मार्ग निवडायचा. त्यात न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगून पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु करणाऱ्या मेरठच्या महासराईताला मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. ईसाक नारायण तेवर उर्फ मुरगन असे प्रतापी घरफोड्याचे नाव असून त्याला यापूर्वी तब्बल २५ गुन्ह्यांत शिक्षा भोगून बाहेर आला आहे. मुळचा मेरठचा रहिवासी असलेल्या मुरगन त्याच्या दोन साथीदार गणपत चावडा, भरत बिदरकोळी यांच्या मदतीने दिवसभर मुंबईच्या दुकानांची मोटार सायकलवरुन रेकी करायचा. त्यानंतर रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या दुकानांचे शटर तोडून ही मंडळी पसार व्हायची. गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यालगतच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील किंमती ऐवज घेउन पसार होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. अशात २१ फेब्रुवारी रोजी मालाड येथील एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून दुकानातील १०९ मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. त्यामुळे येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मालमत्ता कक्षाने तपास सुरु केला.गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, चंद्रकांत दळवी, लक्ष्मीकांत साळूंखे, दिप बने, पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांच्यासह तपास पथकाने अधिक तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेली मोटार सायकल आणि मोबाईल फोनच्या लोकेशनमधून आरोपींचा शोध घेतला. तिघांनाही अटक करत त्यांच्याकडून डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दितील घरफोडीतील ६ मोबाईल फोन जप्त केले. तसेह मुरगनसह तिघेही अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती मालमत्ता कक्षाच्या अधिका-याने दिली. (प्रतिनिधी)
अन्नत्याग बनला सुटकेचा मार्ग
By admin | Published: March 04, 2017 2:10 AM