नागपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती मिळवून संघ मुख्यालयात दाखल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ पदाधिकाऱ्यांशी यावर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.रविवारी दुपारी संघ मुख्यालयात संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमवेत क्षेत्रीय प्रचारक रवी जोशी, प्रदेश भाजपचे संघटन मंत्री रवींद्र भुसारी, महानगर संघचालक राजेश लोया आदी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सायंकाळी ६ च्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस तातडीने नागपुरात दाखल झाले व महालातील संघ कार्यालयात पोहोचले. तेथे या सर्व नेत्यांची तासभर बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. मंत्रिमंडळात असलेल्या कोणत्याही मंत्र्याला कमी करून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा चांगले काम करीत असलेल्या इतर नेत्यांना विस्तारात सामावून घ्यावे, असे या बैठकीत ठरल्याचे समजते. पुढील वर्षात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे गणित आखून कुणाला संधी देणे फायद्याचे ठरेल, यावर विचारमंथन झाले. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईसाठी रवाना झाले. (प्रतिनिधी)> सेनेविरोधात आक्रमक भूमिकाशिवसेनेचे नेते या ना त्या मुद्यावरून सातत्याने सरकारला लक्ष्य करीत आहेत. पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. शिवसेना वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात आतापासूनच आक्रमक व्हायचे की ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घ्यायची, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा
By admin | Published: May 09, 2016 3:35 AM