अशोक खरात / खोडदजगाच्या पाठीवर कमीत कमी भूभागावर सर्वाधिक लेण्या असणारे एकमेव ठिकाण म्हणजे जुन्नर तालुका! मात्र या सर्वच लेण्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पुरातत्त्व विभागाची लेण्यांकडे पाहण्याची दृष्टी ही उदासीन असल्यामुळे काळाच्या ओघात या लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून सध्या भग्नावस्थेत उभ्या आहेत.जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळ असणाऱ्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराच्या काही अंतरावर एक भूसपाटीला असणाऱ्या खडकात एक प्राचीन लेणी कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये सुमारे ३० फूट बाय ५० लांबीचा सभामंडप असून हा सभामंडप १० दगडी खांबांवर उभा आहे. सभामंडपाच्या शेजारीच एक १० बाय १० ची खोली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या लेण्यांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठले जाते. सभामंडपाला असणाऱ्या दगडी खांबांची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे, तर काही खांबांना मोठे तडे गेले आहेत. ही लेणी भुईसपाटीला असल्यामुळे नागेश्वराचे दर्शन घेऊन निघाल्यानंतर ही लेणी लक्षात येत नाहीत. अगदीच जवळ जाऊन पाहिल्यानंतर या ठिकाणी लेणी असल्याचे जाणवते. लेणी म्हणजे दगडात कोरलेले विवर होय. भारतातील सर्व लेण्या या लोहयुगात तयार करण्यात आल्या आहेत.भारतात आतापर्यंत १२०० लेण्या सापडल्या असून त्यापैकी ८०० बुद्धलेण्या आहेत, तर एकट्या जुन्नर तालुक्यात ३५० लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये काही जैन लेण्या व काही बुद्ध लेण्या आहेत. जुन्नर तालुक्यात सर्वात पहिली खोदलेली लेणी ही तुळजा लेणी आहे. या सर्व लेण्या राजे, महाराजे यांनी दिलेल्या दान व देणग्यांमधून तयार झाल्याचे शिलालेखांमधून आढळते. लेणी कोरण्याची कला महाराष्ट्रात १००० ते १२०० वर्षे जोपासली गेली.जुन्नर तालुक्यातील लेण्या या सातवाहनकालीन असून चंद्रगुप्त मौर्य कालाखेर ते इ. स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराचा व प्रचाराचा केंद्रबिंदू म्हणून जुन्नर तालुक्याची एक आगळीवेगळी ओळख आहे. बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचे कार्य सर्वप्रथम जुन्नर तालुक्यात सुरू करण्यात आल्याचे काही ठिकाणी उल्लेख आहे. लेण्यांमधील असणारे शिलालेख हे ब्राम्ही लिपीत असून याची प्राकृत भाषा आहे.- बापू ताम्हाणे, इतिहास अभ्यासक
बाराशे वर्षांपूर्वीच्या लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Published: May 03, 2017 1:38 AM