- सुधीर गाडगीळ
'विसर्जन' होण्याच्या क्षणी भावूक व्हायला होई. लाईट मंदावणार, स्पीकर थंडावणार, खिरापतींच्या खादाडीची मजा संपणार यामुळे कसंनुसं व्हायला होई. बहुतेक वाड्यात विहीरी होत्या. विहीरीवरच आख्ख्या वाड्यातली मंडळी जमून कोरस आरत्यांचा धमाका करुन, 'मोरया' म्हणत विहीरीत 'श्रीं'ची मूर्ती विसर्जीत केली जात असे. सार्वजनिक गणपतींची मिरवणूक असे. आमच्या शनीपाराजवळच्या घरापासल्या रस्त्यावर अनंतचर्तुदशीच्या आदल्या रात्रीपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या गाड्यांची रांग लागत असे. सिटी पोस्ट चौकात दगडुशेठ मिरवणूक आधी येते की, मंडई गणपती याची उत्सुकता असे. मानाची बॅंडपथकं, मानाच्या गणपतींची देखणी सजावट अनुभवण्यासाठी उत्तररात्री घरातून निघून मिरवणूक रस्त्यावर येणं होत असे. मामा रासनेंच्या सुरेल आवाजाची मला ओढ असे ते दगडुशेठ मिरवणुकीच्या आगमनाची घोषणा करत असत. विशिष्ट विषयावरचे देखावे ही पुण्याच्या उत्सवाची शान होती. आमचे बाहेरगावचे नातेवाईक पुण्याचे गणपती देखावे बघण्यासाठी हमखास दोन रात्री पुण्यात हजेरी लावत. अद्यापही पुण्याच्या गणेशदेखावेंची गंमत-उत्सुकता कायम आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कमी कमी होत चाललेत. कलावंतांचे वाढत चाललेले दर, त्यांचं सांभाळावं लागणारं वेळापत्रक यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी दिव्यांच्या झगमगाटातील देखाव्यांकडेच अलीकडे कल आहे. मला मात्र अजूनही ते गावोगावचे रसिक, तो मॅटेडोरचा प्रवास, त्या त्या गावातले व्हीआयपी रसिक आठवत राहतात. गोव्यात मंडपात आमचा कार्यक्रम ऐकायला आवर्जून उपस्थित राहाणारे, सतरंजीवर लेंगा-शर्टात मांडा ठोकून बंदोबस्ताशिवाय येणारे पर्रीकर साहेब आठवतात. उत्तररात्री मिळणारं घरगुती चवीचं ठाण्यातल्या सावंतबाईंचं जेवण आठवतं. रात्रीच्या झोपेत, पुण्यात परतताना, मॅटेडोरच्या दारातून पडलेला तालवाद्यवादक दरेकर आठवतो आणि उत्तररात्री थकून गाढ झोपेत असलेल्या आम्हा मॅटेडोरमधल्या कलावंतांना 'ठाक-ठाक' करत जागे करुन, लायसन्स तपासायला जागे असणारे हवालदार आठवतात. सर्वात लक्षात आहे, ते म्हणजे बारामती जवळच्या एका दुधाच्या गावात रस्त्याच्या एका कडेला आमचं स्टेज, मधून रस्त्यावरुन वाहतूक आणि रस्त्याच्यापलिकडे वाहतुकीच्या व्यत्यत न समजता आमचं गाणं-बोलणं ऐकायला आत्मीयतेने जमणारे श्रोते!अमूकच माईक पाहिजे, इतकं मानधन हवं, एसी गाडी हवी, अशा कलावंतांच्या अटींच्या जगात अलीकडे असणाऱ्यांना त्या 'रस्त्यांवर' उत्साहाने केलेल्या 'शों'ची मजा काय समजणार ?