सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 02:05 PM2024-05-18T14:05:00+5:302024-05-18T14:08:15+5:30
अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Devendra Fadnavis ( Marathi News ) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागील दशकभरात कथित सिंचन घोटाळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र हेच अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी तेव्हा मी केलेले आरोप खरे ठरल्याचा दावा केला आहे.
"२०१४ मध्ये अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणं ही एक चूक होती का?" असा प्रश्न 'द इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "मी केलेले सर्व आरोप नंतर खरे ठरले आहेत. मी जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यावरून कारवाईही करण्यात आली आहे. त्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करून चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे. काही लोक दोषी ठरले आहेत. यामुळे सिंचन खात्यातील काही नियमांची दुरूस्तीही करण्यात आली, याचं मला समाधान आहे. या खात्यात होणारा भ्रष्टाचार नंतर बंद झाला आणि टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणली गेली," अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
"आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण..."
सिंचन घोटाळ्याविषयी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "या प्रकरणात आम्ही अजित पवार यांच्यावर आरोप केले, कारण ते या खात्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना जबाबदार धरणं स्वाभाविक होतं. मागच्या १३-१४ वर्षांमध्ये यंत्रणांनी सर्व बाबींचा तपास केला आहे. मात्र एकाही चार्जशीटमध्ये यंत्रणांना या प्रकरणात अजित पवारांचा थेट सहभाग आढळून आला नाही. त्यामुळे आम्हाला यंत्रणांचा तपास मान्य करावा लागला."
कोकण विभागात काय घडलं?
कथित सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा एकाही प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. "कोकण विभागातील प्रकरणांमध्ये आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या भूमिकांबाबत अजूनही चौकशी करत असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं होतं. मात्र नंतर या तपासातही अजित पवार आणि तटकरेंचा घोटाळ्यातील सहभाग आढळून आला नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.