नवी दिल्ली - भाजपाला मदत होण्यासाठी MIM असेल वा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील त्यांचा गेल्या १० वर्षातील राजकीय कार्यक्रम आहे. हुकुमशाहीविरोधात बोलायचे, केंद्रातील सरकारला शिव्या घालायच्या आणि जेव्हा काही करण्याची, लढण्याची वेळ आली तेव्हा वेगळी भूमिका घ्यायची असं देशातील आणि राज्यातील काही संघटना आणि पक्ष भूमिका घेतात. खरेतर ही वेळ देश वाचविण्याचीलोकशाही वाचविण्याची आहे. अशावेळी सर्व मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावे आणि लोकशाहीचे रक्षण करावे अशी भूमिका घ्यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूचक विधान केले.
मनसे २२ लोकसभा जागांवर तयारी करत आहे त्यावर पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपा आज जो उभा आहे तो फोडा, झोडा आणि राज्य करा या रणनीतीवर उभा आहे.निदान महाराष्ट्रातील नेत्यांनी शहाणपणाने वागावे ही आमची भूमिका आहे. हुकुमशाहीविरोधात लढण्याची तुमची मानसिक तयारी किती आहे यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. देशात लोकशाही टिकली पाहिजे. महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री, दलाली सुरू आहे त्याविरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत याबाबत कुणी ठाम भूमिका व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो असं राज ठाकरेंबाबत संजय राऊत म्हणाले.
शर्मिला ठाकरेंचे मानले आभार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जो आरोप केला जातोय त्यावर राज्य सरकारनं एसआयटी नेमली आहे. यावर आदित्य असं काही करेल वाटत नाही हे विधान राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले होते. त्यावर राऊतांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. आदित्य ठाकरेंवर सगळ्यांचा विश्वास आहे.भाजपाने आमच्यावर आणि आदित्यवर कितीही आरोप केले तरीसुद्धा अशा घाणेरड्या आरोपांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मी शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, धारावीत जो लाखो लोकांचा विराट मोर्चा निघाला त्यात केवळ धारावीतूनच नव्हे तर संपूर्ण मुंबईतून लोक एकटवले होते. कार्यकर्त्यांचा मोर्चा होता अजून जनता रस्त्यावर उतरायची आहे. मुंबईचा सौदा सुरू आहे आणि हा सौदा शिवसेना होऊ देणार नाही. मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला होता. मुंबईचे महाराष्ट्रात रक्षण करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे कुणी शिवसेना आमच्यापासून ओरबडण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना महाराष्ट्र धर्म म्हणून रस्त्यावर उतरणारच असंही संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले.