मुंबई - जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो. त्याच्यावर अन्याय होतो तेव्हा आपला लाडका नेते शरद पवार स्वत: आले. शरद पवार एखाद्याला युवकाला संधी देऊ शकतात. ते संधी देतातही. पण त्याचसोबत कार्यकर्ता अडचणीत असताना त्याच्या पाठिशी शरद पवार भक्कमपणे उभे राहतात. साहेब लढत असताना त्यांना लढणारी माणसं आवडतात. कारण मराठी माणसे लढत असतात. त्यामुळे पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार कायम उभे राहतात. बापमाणूस म्हणून ते इथं होते. बापाला आम्ही बापच म्हणतो, त्यांचे वय काढत नाही. आपल्या सर्वांना वारसा विचारांचा आहे. पण मार्ग संघर्षाचा आहे अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी अजित पवार गटासह भाजपावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर वाकायला हरकत नाही. पण काहीही झाले तरी त्यांच्यासमोर वाकायचे नाही हे आपण ठरवलंय. तुम्ही सर्वजण न बोलवता शरद पवारांच्या प्रेमापोटी इथं आलात. शरद पवार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानी मराठी माणसाच्या हितासाठी लढत आहेत. आज असंख्य हजारो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्याचा प्रयत्न करत होते. काही ठिकाणी पोलिसांनी अडवलं. मी ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य केले आहे. यापुढेही करत राहीन. १२ तास चौकशी सुरू होती. अनेक लोक थकतात, अनेकजण घाबरतात. पण तिथे मी चौकशीला बसलो असताना तुमच्या सर्वांचा आवाज माझ्याकानी पोहचत होता. तुमच्या घोषणेतून मला प्रेरणा मिळत होती असं त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानी माणसांसाठी, अस्मितेसाठी आम्ही लढायचे ठरवलंय. आज १२ तास चौकशी झाली असली तरी येत्या १ तारखेला पुन्हा बोलावले आहे. आज जी काही माहिती हवी ती मी दिलेली आहे. मी व्यवसायात आधी आलो, त्यानंतर राजकारणात आलो. जो व्यवसाय केला तो प्रामाणिक केला. काही लोक आधी राजकारणात मग व्यवसायात आली. अधिकाऱ्यांना सहकार्य करतो याचा अर्थ असा नाही की, माझ्याविरोधात, सुप्रियाताईंविरोधात, शरद पवारांविरोधात की महाराष्ट्र हित जपणाऱ्यांच्याविरोधात फक्त तुम्ही सत्तेत गेला आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
दरम्यान, ईडीच्या चौकशीसाठी मी सकाळी साडे दहा वाजता पोहचलो. त्याठिकाणी जी काही कागदपत्रे हवीत ती मी दिली. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला मी सहकार्य केले. गेल्या १२ तासांत खूप माहिती, डॉक्युमेंट्स मी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर आणखी काही कागदपत्रांसाठी १ तारखेला मला बोलावले आहे. त्यामुळे मी पुन्हा १ तारखेला जाऊन जे काही सहकार्य करायचे ते करेन. मात्र आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथं आले. शरद पवार स्वत: कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे होते. माझ्यावर जे काही राजकीय लोक टीका करत आहेत. उगाच हवेत गोळ्या मारू नका. सारखे सारखे बोलून लोकांना खरे वाटेल या भ्रमात राहू नका. यापुढे खोटं काही सांगण्याचा प्रयत्न केला तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती करू. शिरसाट यांना मंत्री बनवले नाही म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी नाही. जर आम्ही शांतपणे ऐकून घेऊ असं वाटत असेल तर असं होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असंही रोहित पवार यांनी सांगितले.