ठाणे : आम्हीदेखील पब्लिक डॉक्टरच आहोत. आमच्याकडे शेकडो लोक येत असतात. त्यांच्या मनातील सुखदु:खाचा ठाव घेऊन त्यांच्या समस्या जाणून आम्हालाही निरनिराळी औषधे द्यावी लागतात, असे आ. संजय केळकर एका कार्यक्रमप्रसंगी म्हणाले. बायोफिल्ड इव्हॅल्युएशनने आयोजित केलेल्या डॉ. अनुप देव लिखित ‘आभामंडळ - विज्ञान व चिकित्सा’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. केळकर यांच्या हस्ते रविवारी पाणिनी सभागृहात पार पडले. या वेळी ते बोलत होते. आपल्या महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली आहे. या संतांनी केलेले प्रबोधन हे समाजाला ताकद देणारे तसेच, मन-बुद्धी-शरीर विकसित करणारे होते. गीता हा सर्वात मोठा गुरू आहे. ज्याने शरीर व बुद्धी स्थिर राहू शकते. वर्तमानात जगणे हीच मोठी विद्या आहे. माणसाने भूतकाळात रमू नये व भविष्यात डोकावू नये, असे म्हणतात. पण, हेच तंत्र माणासाला जमत नाही. प्रत्येक माणसाने मनाचा अभ्यास केला पाहिजे आणि अध्यात्म जगले पाहिजे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. तसेच, सूक्ष्म शरीराच्या फोटोग्राफीद्वारे होणाऱ्या चिकित्सेतून संभाव्य आजार आगाऊ समजतात व उपचाराद्वारे त्यावर मातही करता येते. हे तंत्रज्ञान क्रांतिकारक असून त्यामुळे मानवाला सुखी माणसाचा सदरा उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुमारे २५ हजार वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी ऋग्वेदात सूक्ष्म शरीराबद्दल लिहून ठेवले आहे. हा सूक्ष्म देह जरी आपल्या पंचज्ञानेंद्रियांना जाणवत नसला तरी त्याबद्दल अधिक माहिती आज उपलब्ध आहे. अतिप्राचीन शास्त्रानुसार आपल्या सूक्ष्म शरीरात सात प्रमुख चक्र व ७२ हजार नाड्या आहेत. ही व्यवस्था आपल्या शरीरातील ग्रंथी व अवयवांना वैश्विक ऊर्जा पोहोचवते. चक्र , नाड्या व तेजोवलय यांना बघण्याची फोटोग्राफी उपलब्ध आहे. या आॅरा फोटोग्राफीच्या साहाय्याने शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक समस्याच जाणता येतात, असे डॉ. देव यांनी सांगितले. डॉ. अरु णा भावे, डॉ. आशा चिरमडे, गोपाळ बेके, अजित जोशी यांनी आपले अनुभव कथन करीत आभामंडळ चिकित्सापद्धती व त्याच्या उपयुक्ततेला दुजोरा दिला. (प्रतिनिधी)
आम्हीदेखील पब्लिक डॉक्टरच
By admin | Published: July 19, 2016 3:23 AM