रत्नागिरी - बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दिलीय. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अधिकार नाही. खरी शिवसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, शरद पवारांसारखी व्यक्ती या वयात राज्यात फिरून अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून मातोश्रीत बसून राहिले. त्यांना इतरांना गद्दार म्हणण्याचा काय अधिकार? १९७० पासून मी शिवसेनेचं काम करतोय. मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने प्रेरित होऊन आम्ही काम सुरू केले. आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या. जेल भोगली. आदित्य ठाकरेंनी किती जेल भोगली? उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हटले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर गादीवर बसले. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे असं कदमांनी सांगितले.
त्या रामदास कदमांना दीड वर्ष भेटले नाही शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब माझ्या कांदिवलीतील गणपतीला नेहमी दर्शनाला यायचे. ज्यावेळी माझ्याकडून चांगले काम व्हायचे तेव्हा मोठे साहेब पाठ थोपटायचे. एकदा संध्याकाळी साडेआठची वेळ होती. राहुल बजाज हे बाळासाहेबांसोबत होते. तेव्हा मी पोहचलो. तेव्हा बजाज यांना माझी ओळख करून देताना साहेब म्हणाले, नारायण राणे, राज ठाकरे जाने के बाद मेरी शिवसेना इसने बचायी असं साहेबांनी माझी ओळख करून दिली. आणि त्याच रामदास कदमांना दीड वर्ष उद्धव ठाकरे भेटत नाही अशी खंत कदमांनी व्यक्त केली.
आम्ही तोंड उघडले तर तुमचे सगळे खोके बाहेर पडतील बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेडशी युती केली. संभाजी ब्रिगेडनं सामना ऑफिसवर दगडफेक केली होती. उद्धव ठाकरे काय आहेत हे संभाजी ब्रिगेडला एकदिवस कळेल. केवळ वापरून घेतोय. माझा अनुभव ५२ वर्षांचा आहे. मी ३२ वर्ष आमदार आहे. अनेक मंत्रिपदे बाळासाहेबांनी दिली. मी मंत्रिपदासाठी आलो नाही. दिलं तरी मी नाकारेन. माझ्या आयुष्यात मी स्वत:वर कधी डाग लावून घेतले नाही. आम्ही तोंड उघडू तेव्हा तुमचे सगळे खोके बाहेर पडतील असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.
आता ती वेळ निघून गेलीमहाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येतायेत. गणपती झाल्यावर अनेक जण आमच्यासोबत घेतली. आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. ४० लोक बाजूला गेले नसते तर बाळासाहेबांची शिवसेना वाचली नसती. केवळ मातोश्रीवर खोक्याचं राजकारण झाले असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मशीन आहे की माणूस कळत नाही. सातत्याने लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत. उद्धव ठाकरेंना भेटायला वेळ नव्हता. फक्त ४-५ बडवे होते. आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची ती वेळ निघून गेली असंही रामदास कदमांनी स्पष्ट केले.