मी एकट्या भाजपाचा नव्हे, शिवसेनेचाही मुख्यमंत्री- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 06:06 PM2019-07-21T18:06:41+5:302019-07-21T18:41:54+5:30

मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवसेनेला टोला

we are fighting against defeated opponents says cm devendra fadnavis | मी एकट्या भाजपाचा नव्हे, शिवसेनेचाही मुख्यमंत्री- फडणवीस

मी एकट्या भाजपाचा नव्हे, शिवसेनेचाही मुख्यमंत्री- फडणवीस

Next

मुंबई: विधानसभा निवडणूक युतीतच लढणार आहोत. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत लोकसभा निवडणुकीतील विजयानं हुरळून जाऊ नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असं आवाहन केलं. 

सध्या शिवसेनेकडून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं जात आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला. मी फक्त भाजपाचा मुख्यमंत्री नाही. तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री नाही. कारण राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार आहे, असं फडणवीसांनी म्हटलं. विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट करतानाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला चिमटा काढला. मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असलेले अनेक जण आहेत. तशी मंडळी आमच्याकडेदेखील आहेत. मात्र त्यांच्याकडे बोलणारी मंडळी जरा जास्तच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

लोकसभा निवडणुकीत जनतेनं युतीला भरभरुन मतदान केलं. राज्यातील जनता माझ्यासाठी दैवत आहे. मतदारांनी दिलेला जनादेश अभिमानाची गोष्ट आहे. मात्र त्याचा कोणीही गर्व करू नये, जनतेला गृहित धरण्याची चूक करू नका, असा सल्ला  मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आपली लढाई पराभूतांविरुद्ध असल्यानं कोणतीच भीती नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांनीदेखील टोला लगावला. विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष पराभूत झालेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली.
 

Web Title: we are fighting against defeated opponents says cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.