मुंबई - Sanjay Shirsat on Uddhav Thackeray ( Marathi News ) दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात या शिवसैनिकांच्या भावना आहे. ज्याला मंत्रिपद नको, आमदारकी, खासदारकी नको. कुठलेही पद नको त्या शिवसैनिकांनी बॅनर लावले आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं सांगत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजधानी दिल्लीत काही शिवसैनिकांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनेला एकत्रित येण्याचं आवाहन केले आहे त्यावर भाष्य केले.
संजय शिरसाट म्हणाले की, ज्यांनी बॅनर लावलेत त्यांना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी. आम्ही उठाव केला तर काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली. हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने पुढे जावेत ही त्या शिवसैनिकांची भावना आहे. त्याचा आम्हा सन्मान करतो. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही कित्येकदा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून द्या सांगितले. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कारण खुर्चीची हाव होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीही खुर्ची घेऊ दिली नसती. सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली असती. खुर्चीसाठी कुणी तडजोड करायचं ठरवलं तर त्याला नाईलाज आहे. त्यामुळे आम्ही केलेला उठाव होता. आता आम्ही कितीही पाऊले पुढे टाकली तरी त्यांना वाटेल हे मजबूर झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही म्हणून पुन्हा धावपळ सुरू झाली म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्ही आहोत तिथे चांगल्या मजबूतीने उभे आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत असंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आमची कुठलीही मागणी नव्हती. जे मिळालं ते घेतले. मात्र इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आम्हाला दुसऱ्याचं वाकून पाहण्याची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही सत्तेबाहेर आहात, उगाच चर्चा घडवायची. बघा इतकं असून यांना काही मिळालं नाही. त्यामुळे आमचं आम्ही पाहू. तुमचं तुम्ही पाहा असा टोला शिवसेनेने ठाकरे गटाला लगावला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार व्हावा विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी आज बैठक होतेय. येणाऱ्या निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी रणनीती ठरवली जाईल. काही आमदारांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जातील. मंत्रिमंडळ विस्तार हा करावा लागेल. ३ महिन्याचा कालावधी असला तरी मंत्रिमंडळ विस्तार करून कामांना गती येईल. विस्ताराबाबत वरिष्ठ नेते ठरवतील. विधानसभेला कुणी किती जागा लढवायच्या हे नेते ठरवतात. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत चर्चा केली. या चर्चा जाहीर येऊ नये त्यातून इतरांना आपल्यावर टीका करण्याची संधी मिळते असं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.