मुंबई - आज सकाळपासून शिवसेनेमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी सनसनाटी पत्रकार परिषद घेत स्वपक्षीयांवरच गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे हिंगोलीमधील खासदार हेमंत पाटील यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असलेली घुसमट व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये आमचं १०० टक्के नुकसान होत आहे. या आघाडीमध्ये आमचा वापर करून घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.
यावेळी हेमंत पाटील यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असं म्हणणारे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असा विचार कुणी करू नये. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता याचा विचार करा, असा टोला हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत नाराज असलेले रामदास कदम यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत मनातील खदखद व्यक्त केली आहे. अनिल परब यांच्या विरोधात बोललं की पक्षाच्या विरोधात बोललं अशी परिस्थिती आता झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमकं कोण आहेत? उद्धव ठाकरे की अनिल परब?, असा सवाल उपस्थित करत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. अनिल परब कोकणात शिवसेनेचं अस्तित्त्व संपवण्याचं काम करत असून ते खरे गद्दार आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
"अनिल परब हे शिवसेनेला गहाण ठेवण्याचं काम करत आहेत. मला आणि मुलाला तिकीट मिळू नये म्हणून परब सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मला कोणतंही मंत्रिपद नकोय. मी तर दोन वर्षांपूर्वीच राजकाराणातून निवृत्तीची घोषणा केलीय. मग माझ्या नाराजीचा विषय येतोच कुठून? पण अनिल परब यांच्या अरेरावीपणाचा माझ्या मतदार संघात माझ्या मुलाला त्रास होतो आहे. याचं दु:ख मला आहे", असं रामदास कदम म्हणाले होते.