पंढरपूर: राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेलं विठ्ठल मंदिर अखेर उघडण्यात आलं. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी वारकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली. मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं आंबेडकर म्हणाले. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं माझ्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शनमंदिरं खुली करण्याचा मुद्दा हाती घेऊन वंचितनं हिंदुत्व पकडलं का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. यानंतर आंबेडकर काही सेकंद थांबले. 'महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही गुरू मानतो. या तिघांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्म अविभाज्य अंग आहे, अशीच त्यांची भावना होतो. आम्ही त्यांच्या विचारांनुसार चालतो. कोणी कोणाला मानायचं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर कोणतीही व्यक्ती ते लादू शकत नाही, असं उत्तर आंबेडकर यांनी दिलं. विठ्ठ्लाच्या भाविकांना पंढरपूरला यायचं आहे. विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. मात्र सरकारच्या नियमांमुळे त्यांना येणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही प्रार्थनास्थळं उघडण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन केलं, असं ते पुढे म्हणाले.