ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 23 - टाळ मृदंगाचा गजर, ढोल, बासरीच्या सुरांमधील भजने, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला, राष्ट्रसंतांची भजने गात त्यावर पाऊल्या खेळत, लेजीमच्या तालावर नृत्य करणा-या चिमुकल्या मुलांनी शुक्रवारी सकाळी अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रेत गायिलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमधून जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही...अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खलनिंदका मनीही सत्य न्याय वसु दे...दे वरचि असा दे...असा संदेश अकोलेकरांना देत, स्वच्छता, हगणदरीमुक्त गावाबाबतही शोभायात्रेत जागरण करण्यात आले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सेवा समितीच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता राजराजेश्वर मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात सोपान महाराज येरळीकर यांनी केली. ग्रामदैवत राजराजेश्वराचे पूजन केल्यानंतर पालखीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन व हार्रापण करून शोभायात्रेला सुरुवात झाली. ही शोभायात्रा जयहिंद चौक मार्गे कोतवाली चौकात आली. या ठिकाणी शोभायात्रेचे सामाजिक व धार्मिक संघटनांच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा गांधी रोड, मनपा कार्यालयासमोरून मार्गक्रमण करीत, ही शोभायात्रा हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकातून स्वराज्य भवन प्रांगणात आली. शोभायात्रेमध्ये रवींद्र मुंडगावकर, डॉ. अशोक ओळंबे पाटील, सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, शेख गुरुजी, आमले महाराज, गुलाबराव महाराज, सावळे महाराज, मंगला पांडे यांच्यासह संत गाडगेबाबा व्यायाम शाळा, बाल हरिपाठ मंडळाचे किशोर लडे, विनोद पवार, रामदास पाथरकर, राजू धोटे, गजानन चिकटे, मोहन लडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगावचे लेजीम पथक, ज्ञानेश्वर महाराज बालसंस्कार देगाव मानकी, रामगोपाल महाराज ढोलाचे भजन, पळसो बढे, कासली, कान्हेरी सरप, घुसरवाडी, घुसर, पिंपरी खुर्द, घुंगशी, मुंगशी, दिवठाणा, करतवाडी व विझोरा येथील महिला भजनी मंडळे, टाळकरी मंडळे सहभागी झाले होते.
भजने शिकण्याची जिल्हाधिका-यांची इच्छा
राष्ट्रसंतांची ग्रामगीता मी वाचली असून, त्यामध्ये देशाच्या विकासाचा, अर्थव्यवस्थेचा, राजकारणाचा, ग्रामविकासाचा अभ्यास मांडलेला आहे. राष्ट्रसंतांची भजने ही नेहमीच प्रेरणादायी राहिलेली आहेत. अनेकदा भाषणे देण्यासाठी आम्हाला जावे लागते. त्यामुळे शेख गुरुजींनी आम्हाला राष्ट्रसंतांची भजने शिकवावी. भजने शिकण्याची माझी उत्कट इच्छा आहे. त्यामुळे आपण भजने शिकायला आतुर असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले.