शिवसेनेचे मातब्बल नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडाचे निशाण फडकावून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी शिंदे गटाची मुख्य मागणी आहे. त्यांच्या या मागणीवर एक पाऊल मागे येत, माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू त्यांनी पुढील २४ तासांत मुंबईत यावे." राऊतांच्या या वक्तव्यावर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ म्हणाले, "आमच्यासाठी हे काही नवे नाही, सत्ता येते, सत्ता जाते. कधी विरोधी पक्षात कधी सरकारमध्ये. आमची तयारी आहे. त्यांना (शिवसेनेला) जे काही सांगायचे आहे, त्यांनी आमचे नेते शरद पवार आणि अजित दादा यांना सांगावे आणि हा संभ्रम एकदाचा दूर करावा. यावेळी एका पत्रकाराने, शिवसेनेने बाजी सोडली आहे का? असे वाटते का? असे विचारले असता, भुजबळ म्हणाले, "मी शिवसेनेने बाजी सोडली, वैगेरे यावर काहीही बोलणार नाही. कारण ते आमच्या सरकारमधील सहकारी पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही विधान करणे योग्य नाही."
यावेळी, एका पत्रकाराने भुजबळ यांना विचारले, की राष्ट्रवादीचे काही आमदार बोलत आहेत, की आपणही भाजपसोबत जाण्यची गरज आहे, अशी काही मागणी तुमच्याकडे आली आहे का? यावर भुजबळ म्हणाले, भाजपसोबत जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी नाही. पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष, कार्यकर्ते, आमदार मजबूतपणे उभे आहेत.
काय म्हणाले होते राऊत - "शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.