लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत साहाय्यासाठी आम्ही नेहमीच पुढे होतो. तरीही आमच्याकडे कायम अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते. प्रत्येक वेळी देशभक्ती आणि निष्ठा सिद्ध करण्याची सक्ती आमच्यावर केली जाते, अशी खंत श्रीनगर येथील काश्मीर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मुश्ताक वाणी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘काश्मीर, ए डायलॉग फॉर पीस अॅण्ड इंटिग्रेशन’ या एकदिवसीय परिसंवादात ते बोलत होते.काश्मीरबाबत सतत नकारात्मक बातम्या पसरविल्या जातात. त्यामुळे लेह, लडाख, जम्मूच्या तुलनेत केवळ १० टक्के पर्यटक काश्मीरकडे येतात. बडे उद्योजकही येथे उद्योग उभारण्यास धजत नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी येथील तरुणांना केवळ शासकीय नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, असेही वाणी म्हणाले. या परिसंवादात बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील मराठमोळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, काश्मीरमध्ये काम करणाऱ्या असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी, सद्भावना संस्थेचे संजय भावसार, सरहद संस्थेचे संजय नहर आदी सहभागी झाले होते.प्रशासनाची कार्यक्षमता गरजेची - डॉ. डोईफोडेआपल्याला वाटते त्यापेक्षा काश्मीरमधील परिस्थिती पूर्ण वेगळी असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी या वेळी सांगितले. येथे काम करताना कोणतेही दडपण नाही. मात्र नागरी सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचे चित्र आहे. ते पालटण्यासाठी अधिक कार्यक्षम प्रशासनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
आमच्याकडे अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते! - मुश्ताक वाणी
By admin | Published: July 08, 2017 4:11 AM