सातारा – राज्याचं राजकारण सध्या हिंदुत्वाच्या भोवतीनं फिरत असताना साताऱ्यात शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा महाराष्ट्रानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असं भाजपाने म्हटलं आहे.
भाजपाकडून शरद पवारांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. यावर म्हटलंय की, नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा असा टोला त्यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
साताऱ्याच्या सभेत शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले की, हल्लीच्या काळात समाजाच्या लहान घटकांवर अन्याय झाला, असे अनेक लोक आपल्या कामाने पुढे येतायेत. मी औरंगाबादला जायचो तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये उपेक्षित समाजातील मुले-मुली शिकायची. शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना या कुटुंबातील मुले उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड नावाचा एक कवी होता तो हयात नाही. परंतु त्याने लिहिलेली कविता मला आठवते. त्या कवितेचं नाव पाथरवट असं होतं.
या पाथरवट कवितेत तो म्हणतो, तुमचा दगड धोंडा आमही आमच्या छन्नी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला. पिठ तयार करायला जे लागतं ते आम्ही घडवतो. ज्या जात्यातून पिठ निघतं त्याने तुमचं पोट भरतं. आज आम्ही अनेक गोष्टी घडवल्या. आमच्या छनीने, हातोड्याने आणि घामाने, तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या मूती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, ब्रह्मा, विष्णू आणि महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देव, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असं काव्य जवाहरनं लिहून ठेवल्याचं शरद पवारांनी सांगितले.