राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून जबरदस्त राजकारण सुरू आहे. दोन्ही पक्षातील नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. यातच, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी, 'ज्या शाळेत शिवसेनेने हिंदूत्व शिकले, त्या शाळेचे हेडमास्तरच आम्ही आहोत,' अशा शब्दात शिवसेनेला टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.
यांच्या शाळेचे हेडमास्तर आम्हीच होतो - "आज शिवसेना हिंदुत्वापासून कोसो मैल दूर गेली आहे. तेव्हा आमच्या शाळेत हे 30 वर्ष शिकले आहेत आधी आणि आता हे काय राज ठाकरेंना सांगतात, की यांचे शिक्षक दुसरेच आहेत म्हणून. यांच्या शाळेचे हेडमास्तर आम्ही आहोत. हे ज्या शाळेत हिंदूत्व शिकलेतना, त्या शाळेचे हेडमास्तरच आम्ही आहोत. हे (शिव सेना) तर आमचे विद्यार्थी होते. यांनी जेव्हा आमची शाळा सोडली आणि दुसऱ्या शाळेत गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागली, की आपल्याकडून चूक झाली. चूक दुरुस्तही करता येईना आता," असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरूनही साधला निशाणा -बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून सेनेवर निशाणा साधताना दानवे म्हणाले, "बाबरी मशीद पडली तेव्हा मी स्वतः आयोध्येत होतो. त्या ठिकाणावर होतो. दुर्बिनीने शोधूनही आम्हाला तेथे एखादा शिवसैनिक दिसला नाही. जर एखादा शिवसैनिक तेथे होता, तर त्याचा एखादा पुरावा यांनी (शिवसेनेने) दाखवावा, की तेथे कोणता शिवसैनिक होता. तेथे हे कुणीही आले नाही. मी स्वतः तेथे होतो, गोपिनाथराव मुंड तेथे होते आणि त्यावेळचे भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. शिवसेना नव्हती. आता जे आम्ही केले, त्याचे श्रेय जर हे लाटत असतील, तर या देशातील जनतेला सर्व समजते."