शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By admin | Published: February 03, 2017 7:27 AM

सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी पारदर्शकतेच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांपर्यंत सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी तोंडघशी पाडले आहे. याचाच दाखल देत आज सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांपर्यंत सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 
 
'पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?', असा उलट प्रश्नच उद्धव यांनी भाजपाला केला आहे.
सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा बाण देखील उद्धव यांनी भाजपावर सोडला आहे.
 
भ्रष्टाचारावर शिवसेनेवर वारंवार हल्लाबोल करणा-या किरीट सोमय्या यांना तर उद्धव यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. 
'देशातील 21 महानगरपालिकांत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावून सगळ्याच बोबड्यांची थोबाडे बंद केली आहेत', अशी सोमय्यांवर करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, केंद्राने मुंबई मनपाला दिलेल्या पारदर्शी कारभाराच्या प्रशस्तीपत्रामुळे प्रचारात भाजपाचे मोठे अस्त्र ठरणाऱ्या या मुद्द्याची हवाच गेली आहे.
(भाजपा पडली तोंडघशी, मुंबई पालिका सर्वात पारदर्शी)
 
काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये
 
कोंबडा आमचा, सूर्यही आमचाच!
भारतीय जनता पक्षाचे काय करावे, असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडला असेल. खासकरून त्यांच्या त्या पारदर्शकतेच्या मुद्यावरून. पण त्यांच्याच केंद्र सरकारने आता त्यांना पारदर्शक माती खायला लावली आहे. मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक की काय तसा होणार असेल तर आम्ही शिवसेनेशी युती करू अशी नवी पुडी सोडून ही मंडळी ११४ जागांचा ‘मावा’ बाहेर काढून तो चोळत बसली होती. त्यांची हाव ही नक्कीच जास्त जागांची होती आणि पारदर्शकता हा फक्त बनाव होता हे आता त्यांच्याच केंद्र सरकारने उघड केले आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा स्वच्छ, पारदर्शक व उत्तम असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर देशातील २१ महानगरपालिकांत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावून सगळय़ाच बोबड्यांची थोबाडे बंद केली आहेत. पारदर्शकता व जबाबदारीच्या मुद्यांवरही मुंबई पालिका शंभर टक्के पुढेच आहे. केंद्र व राज्य सरकारचे विशेष सहाय्य नसतानाही मुंबई महानगरपालिकेने कारभाराच्या बाबतीत जे स्वच्छ यश प्राप्त केले त्याचे श्रेय मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही द्यावे लागेल.
 
नागरी सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या बाबतीत मुंबई महापालिकेचे काम वाखाणण्यासारखे आहे. राज्य सरकारातील राजकीय माफियागिरीच्या फालतू आरोपांची पर्वा न करता हे काम झाले. मुख्य म्हणजे सगळेच आर्थिक व्यवहार चोख म्हणजे पारदर्शक असल्याने आरोप करणाऱ्या बोबड्या माफियांवर स्वतःचाच अंगठा झिजेपर्यंत चोखत बसण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वच निर्णय ‘सर्व्हे’ आणि ‘चिंतन’ करून घेत असतो. खरे तर ‘नोटाबंदी’ निर्णयाने जनता बेजार झाल्याचे चित्र असतानाही पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ‘सर्व्हे’त जनता त्यांच्या बाजूने असल्याचे दाखवले होते. मग मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचे प्रशस्तिपत्र केंद्र सरकारनेच दिले आहे. प्रश्न इतकाच आहे की, पारदर्शकतेच्या बाबतीत जे काम मुंबई महानगरपालिकेने केले ते ‘स्वच्छ’ काम आमच्यावर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या ताब्यातील महापालिका करू शकल्या नाहीत. चंदिगढ, दिल्ली, भोपाळ अशा महत्त्वाच्या शहरांतील महानगरपालिका पारदर्शकतेच्या बाबतीत अनागोंदी कारभाराचे शेण खात आहेत व मुंबईच्या तुलनेत त्यांची पारदर्शकता शेवटच्या पायरीवर आहे हे केंद्रीय अहवालातच स्पष्ट झाले आहे. भोपाळचे म्हणाल तर मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे व दिल्लीवर तर स्वतः मोदी यांची हुकमत आहे.
 
मग महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना अभिप्रेत पारदर्शकता तिथे का नाही? मुंबईचे ठेवा बाजूला, खुद्द मुख्यमंत्री ज्या नागपूरचे नेतृत्व करतात त्या नागपूर महानगरपालिकेचे नामोनिशाणही स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या यादीत नसावे यामागची कारणमीमांसा व चिंतन पारदर्शकतेने होणे गरजेचे आहे. स्वतः भ्रष्टाचाराच्या पानपट्टीवर बसून दुसऱ्यांवर पिचकाऱ्या टाकणे सोपे असते, पण जेव्हा पारदर्शक सत्य समोर येते तेव्हा आरोप करणाऱ्यांचीच थोबाडे रंगतात. मुंबई महानगरपालिकेवर वाकडी नजर असणारेच हे असले आरोप करू शकतात. पण कुणी कितीही घाणेरडे आरोप केले तरी मुंबईसह महाराष्ट्राची जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही व आता तर तुमचेच केंद्र सरकारदेखील घाणेरडे आरोप स्वीकारायला तयार नाही. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय? सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न. सत्ता येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवावे लागतात. काही लोक कायम हवेत तरंगत असतात. हे तरंगणे आता संपेल व गुडघ्यावर रांगणे सुरू होईल. तो दिवस लांब नाही.