मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उर्दू भाषेतील ‘इन्कलाब जिंदाबाद’ या ना-यानेच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना देशासाठी प्राणाची आहुती देण्यास प्रेरित केले. त्यामुळे कुठल्या तरी देशाने उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला म्हणून आपण उर्दूकडे पाठ फिरविण्याचे काहीच कारण नाही. उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा आहे. त्यामुळे उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यातही त्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत २०१५ व २०१६ वर्षाकरिता दिल्या जाणाºया विविध पुरस्कारांचे वितरण सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उर्दू अकादमीचे अबू आझमी, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार काझी अब्दुर सत्तार (अलीगढ), फुजैल जाफरी (मुंबई) यांना तर वली दखनी राज्य पुरस्कार काझी मुश्ताक अहमद (पुणे) व वकील नजीब (नागपूर) यांना प्रदान केले. या समारंभात २०१५ करिता ५९ व २०१६ करिता ५७ अशा एकूण ११६ साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, शिक्षक इत्यादींना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत पुरस्कार, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा,उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत - तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 3:07 AM