मुंबई – राज्याच्या राजकारणात एकीकडे मराठा आरक्षणानं वातावरण पेटलं असताना दुसरीकडे भाजपाच्या एका ट्विटर व्हिडिओमुळे राजकीय सस्पेन्सनंही जोर धरला. भाजपानं देवेंद्र फडणवीसांचा मी पुन्हा येईन असा व्हिडिओ पोस्ट केला आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे अलीकडेच दिल्लीला गेले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या ट्विटने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
मी पुन्हा येईन या व्हिडिओवर विरोधकांनी निशाणा साधला. आता या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहे. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहोत असं फडणवीसांनी स्पष्ट केले.
तसेच जर एखाद्याला यायचे असेल तर व्हिडिओ टाकून येतो का? हा माझा पहिला प्रश्न आहे. किती वेडेपणा, काहीतरी डोके ठिकाणावर असले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. १ दिवसही कमी नाही आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहोत. एखादा व्हिडिओ पडला त्याचे अर्थ काढणे चुकीचे आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. दरम्यान, ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात त्यांनी ज्यांच्या नेतृत्वात ४ खासदार निवडून येतात अशांचा धसका घेतलाय असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. शरद पवार नेमके काय बोलले हे मी ऐकले नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असंही फडणवीसांनी सांगितले.
संजय राऊतांनी केले होते स्वागत
मी पुन्हा येईनचे आम्ही स्वागत करतो कारण ते निदान कायदेशीर मुख्यमंत्री असतील. आम्ही घटना मानणारे लोक आहोत. जर ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने पुढे येऊन सरकार बनवणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. जे बेकायदेशीर आदेश पोलीस यंत्रणा पाळते, अशावेळी बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि सरकारला घालवून ते तात्पुरती व्यवस्था आणि कायदेशीर मुख्यमंत्री येणार असतील तर त्यांचे लोकशाहीत स्वागत करावे लागते आम्ही ते नक्कीच करू असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या विधानाला पाठिंबा दिला होता.