लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हातात हात घेऊन लढणारे भाजपा आणि शिवसेना हे दोघं भाऊ आज एकमेकांची तोंडं पाहायलाही तयार नाहीत. दोघंही आपापले हट्ट सोडायला तयार नसल्यानं, निकालाच्या १२ दिवसांनंतरही राज्यात सरकारस्थापनेचा मुहूर्त ठरत नाहीए. असं असताना, आज भाजपानं शिवसेनेला चर्चेची ऑफर दिली आहे. परंतु 'अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद' या एका ओळीच्या प्रस्तावावर शिवसेना अडली आहे. तो मंजूर असल्याचं लेखी स्वरूपात द्या, असं सांगत शिवसेनेनं भाजपाच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यावरून आज भाजपा नेते गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आपली युती आहे. इतकी वर्षं आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा काय भारत-पाकिस्तानमधला विषय आहे का?, आम्ही तुमचे दुश्मन आहोत का?, असे रोखठोक प्रश्न गिरीश महाजन यांनी शिवसेनेला केले. लेखी देऊन सुटणारा हा विषय नाही, समोरासमोर बसून हा विषय मार्गी लावला पाहिजे, असं म्हणत त्यांनी शिवसेना नेत्यांना चर्चेचं आवताण दिलं आहे. निकाल जाहीर झाल्यापासून सातत्याने आम्ही शिवसेनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्रिपद भाजपाकडेच राहील, यावर आम्ही ठाम आहोत. मात्र, त्याबाबतही चर्चा करायची आमची तयारी आहे. आमचं आम्ही पाहून घेऊ, ही भूमिका योग्य नाही. मोठा भाऊ या नात्याने चर्चेतून मार्ग काढू असं आम्ही म्हणतोय. परंतु, चर्चाच होणार नाही, हे त्यांचं वागणं सयुक्तिक नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत
कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान
शिवसेना नेते संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, ती आम्हालाच काय; पण मतदारांनाही रुचत नाहीए. कारण जनतेनं एका विचारधारेला कौल दिला आहे, महायुतीला बहुमत दिलं आहे, असं महाजन यांनी निक्षून सांगितलं. अन्य कुठल्याही पक्षासोबत जायचं पाप आम्ही करणार नाही, महायुतीचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, शिवसेनेचा एकंदर पवित्रा पाहता, मुख्यमंत्रिपद द्यायला तयारच नसलेल्या भाजपाशी ते चर्चा करतील का, याबद्दल शंकाच आहे.
शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!
आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची!
आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर