मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; मुंबई, ठाण्यासह १८ जागांसाठी ठाकरे गट आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:28 AM2024-01-09T11:28:47+5:302024-01-09T11:31:12+5:30
काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील असंही राऊतांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा तिढा नाही. राष्ट्रवादीला ज्या जागा हव्यात तिथे शिवसेना लढणार नाही. काँग्रेससोबतही काही जागांवर चर्चा आहे. फार कमी जागांवर शिवसेनेचा दावा आहे. तरीही आज एकत्र बसून चर्चा करू. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समिती बनवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होईल. त्यात आराखडा तयार होईल. जर या बैठकीत मतभेद झाले तर त्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची बैठक होऊल त्यात तोडगा निघेल. राज्यात ४८ जागा लोकसभेच्या आहेत. उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ ही राज्ये २०२४ च्या निवडणुकीसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे महाराष्ट्र समर्थपणे पेलावे लागेल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात सातत्याने २३ जागा लढत आलोय. आता कुणी काहीही म्हणत असलं तरी हे सत्य आहे. ३०-३५ वर्षाचे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. २०१९ ला शिवसेनेने १८ खासदार जिंकून आले होते. जिंकलेल्या व्यक्तीने पक्षांतर केले तरी मतदार पक्षांतर करत नाहीत. ज्यांनी आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान करतो तो गटाला मतदान करत नाही. त्यामुळे आम्ही जिंकलेल्या १८ जागा पक्क्या आहेत. छत्रपती संभाजीनगरची जागा थोड्या मताने पराभव झाला. मुंबई, ठाण्याच्या प्रामुख्याने जागा आहेत. मुंबई, ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच काहीही असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून एकत्रित महाराष्ट्राच्या निवडणुका लढतील. या देशात ज्यारितीने हुकुमशाहीची राजवट सुरू आहे. त्यापेक्षाही भयंकर खूनी, दरोडेखोर, बलात्कारी यांना खुले समर्थन देणारी आणि त्यांच्यासाठी न्याय व्यवस्था झुकवणारी अशा सरकारला या देशात आणि राज्यात राहू द्यायचे का आमच्यासमोरील महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे समर्थ पर्याय आम्ही जनतेला देत आहोत असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, प्रत्यक्षात आम्ही टेबलावर बसून चर्चा करू त्यावेळी जागावाटपावर निर्णय होईल. आम्ही कोणत्या जागांवर दावा केलाय, कुठे लढणार हे जाहीरपणे बोलणार नाही. परंतु लोकांना कोण कुठे लढतोय हे माहिती असते. प्रत्येक पक्ष ४८ जागांची चाचपणी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सगळ्या ४८ जागांसाठी चाचपणी केलीय. त्यानंतर आम्ही २३ जागा पक्क्या केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ४८ जागांची चाचपणी केलीय. हे प्रमुख पक्ष राज्यातले आहेत. संघटन संपूर्ण राज्यात असते. जिल्ह्यातील, मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे मत ऐकले जाते असं संजय राऊत यांनी सांगितले.