खेड: काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आज त्याच मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. अनेक नेत्यांनी अन् लाखो कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घाम गाळला. पण, तुम्ही फक्त सत्तेसाठी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब म्हणायचे, सत्ता येते-जाते, पण नाव गेलं की, परत येत नाही. तुम्ही सत्तेसाठी नाव घालवलं, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
त्यांच्या मांडीला मांडी लावून...ते पुढे म्हणाले, आपल्यालाला शिवसेना पुढे न्यायची आहे, बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत. शिवसेनेला पूर्वी डाग लावण्याचा प्रयत्न केला, तो पुन्हा लावू द्यायचा नाही. गद्दारी आम्ही नाही केली, गद्दारी 2019 मध्ये झाली होती. बाळासाहेंबांचे विचार तुम्ही चुकीचे ठरवले. कशासाठी? सत्तेसाठी...हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, मुंबईत हजारो लोक मारले, त्यांना साथ देणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून तुम्ही बसला. याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण तुम्ही कसे करू शकता. हीच हिंदुत्वाशी बैमानी आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, यावर तुम्ही काहीच बोलत नाही. तोंड दावून बुक्क्यांचा मार सहन करायची वेळ येते. मनिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला होता, तेव्हा बाळासाहेबांनी चपलेने झोडपले होते. पण, तुम्ही राहुल गांधींना काही बोलत नाही. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला.
बाळासाहेब आमचे दैवत आहेततुम्ही खोके-खोके गद्दार-गद्दार म्हणून किती पाप झाकणार. बाळासाहेब तुमचे वडील होते, हे आम्हाला, जगाला मान्य आहे. पण, ते आमचे दैवत होते. तुम्ही त्यांना वडील-वडील करुन छोटे करू नका. खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. 70 वर्षे या देशाची लूट करणाऱ्या टोळीसोबत तुम्ही आहात की, काश्मीरमध्ये कलम 370 हटवणाऱ्या देशभक्तासोबत आहात? भारताचे तुकडे करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत तुम्ही आहात की, त्या लोकांना त्यांची जागा दाखवणाऱ्या लोकांसोबत तुम्ही आहात? देशावर घराणेशाही लादणाऱ्या लोकांसोबत तुम्ही सोबत आहात की, दिवस-रात्र देशासाठी काम करणाऱ्या नरेंद्र मोदींसोबत आहात? परदेशात देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना पंतप्रधान करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही आहात? असे सवाल यावेळी शिदेंनी विचारले.