त्यांना जमले नाही ते आम्ही करतोय- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 02:54 AM2018-11-02T02:54:08+5:302018-11-02T02:54:59+5:30
विकासकामांच्या माध्यमातून पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुणे: वीस वर्षांच्या सत्तेत त्यांना जे जमले नाही ते आम्ही वर्षभरात करतो आहोत. मुंबईनंतर पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. विकासकामांच्या माध्यमातून पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी सायंकाळी फडणवीस यांच्या हस्ते झाले.
पालकमंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी तसेच महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे या रस्त्याचा विषय गाजतो आहे. त्यात जाणीवपूर्वक अडथळे आणले जात होते. पुणे हे मुंबईनंतरचे महत्त्वाचे शहर आहे. म्हणूनच आम्ही मेट्रो आणली, नवे विस्तारित मार्ग होत आहेत, स्वारगेटमध्ये मोठा ट्रान्सपोर्ट हब तयार करतो आहोत. २० वर्षे या विषयांची फक्त चर्चाच व्हायची. काम काहीच होत नव्हते. अशा सर्व गोष्टींना आम्ही मान्यता दिली. रस्ते, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचºयापासून वीजनिर्मिती, रस्त्यांचे, पुलांचे जाळे असे सर्व काही करतो आहोत. केंद्र व राज्य सरकारची मदत होते आहे. पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
टिळक म्हणाल्या, ‘‘अपघात कमी होण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्याच्या कामाची निविदा काढली. त्यावर आक्षेप घेतले गेले. तीन वेळा निविदा काढली व नंतरच काम दिले. सर्व दृष्टीने रस्ता वैशिष्ट्यपूर्ण केला आहे. त्यावर सायकल ट्रॅक आहे. वृक्ष लावण्यात येणार आहेत. पुण्यातील हा एक वैशिष्ट्यपूर्ण रस्ता होणार आहे. त्याचे काम लवकर होण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील.’’
आमदार योगेश टिळेकर म्हणाले, ‘‘महापालिकेत १९९७मध्ये समावेश झाल्यानंतर या भागाच्या फार अपेक्षा होत्या, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात काहीही झाले नाही. २० वर्षात त्यांनी या भागाला फक्त ५ कोटी दिले. आणि आता भाजपाच्या सत्ताकाळात फक्त रस्त्याच्या कामाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी २०० कोटी मंजूर केले. त्यांच्याच प्रयत्नांमधून रस्ता होत आहे.’’ अनिल धायबर यांनी सूत्रसंचालन केले. मंत्रघोषात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
पालकमंत्र्यांच्या मौनाची चर्चा
पालकमंत्री बापट कार्यक्रमाला उपस्थित होते, मात्र त्यांचे भाषणच झाले नाही. पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ते हा प्रश्न सुरू झाल्यापासून मौन बाळगून आहेत. शहरात ते जाहीर कार्यक्रम करतात, मात्र पाण्याच्या विषयावर काहीच बोलत नाहीत. त्यांचे हे गप्प बसणे आता शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
आमदार टिळेकर यांचे कौतुक
आमदार टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर फिर्यादीने तक्रार मागे घ्यावी यासाठी त्यांनी त्याची भेट घेऊन याचना केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येतील की नाही अशी चर्चा होती. मात्र ते आले व त्यांनी टिळेकर यांचे रस्त्यासाठी मोठा संघर्ष केला असे कौतुकही केले.
शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
भूमिपूजन कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांना गणवेशात उपस्थित ठेवण्यात आले होते. रस्ता अरुंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. काम सुरू केले त्यासाठी तुम्हाला थँक्स म्हणावे म्हणून मुले आली असल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले.
शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न
भाजपाच्या विरोधात शिवसेनेने या रस्त्याचे बुधवारी भूमिपूजन केले. त्याचा आमदार टिळेकर व महापौर टिळक यांनी ‘केविलवाणा प्रयत्न’ असा उल्लेख त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. त्यांचे ९ नगरसेवक आहेत व कार्यक्रमाला शंभर लोकही नव्हते, अशा शब्दांत आमदार टिळेकर यांनी त्या कार्यक्रमाची संभावना केली.
महिला नगरसेवकांचा उत्साह
कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी सर्व महिला नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या मागे रांगेत उभ्या राहिल्या. फोटोग्राफरला त्या पटकन फोटो काढ म्हणून खुणावत होत्या. मुख्यमंत्र्यांच्याही ते लक्षात आले व त्यांनी मागे पाहून हसून त्यांना दाद दिली.