Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काल तीन तीन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
आज सकाळी मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी या घटनेला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचीही जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया दिली होती, या प्रतिक्रियेवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, एखाद्या माजी मंत्र्यावर गोळीबार होणे हे फार दुर्देवी आहे.त्या आरोपींना लगेच पकडण्यात आले आहे. आरोपींनी फटाक्यांच्या आवाजाचा फायदा घेऊन ही घटना घडवली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या ही घटना लक्षात आली नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
"या घटनेचे आम्ही समर्थन करत नाही, घटनेच्या अर्ध्या तासानंतर आरोपींना पकडण्यात आले आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचीही जबाबदार आहे. जबाबदारी आम्ही नाकारत नाही. आरोपींना आम्ही शिक्षा देऊ, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
"आता ही तरुण १०, २०, ५० हजार रुपयांसाठी हत्या करतात. यापाठिमागे खंडणी प्रकरण आहे. यामागे राजकारण अजिबात नाही. याच्यामागे काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार आहे. पोलिसांना यातले सर्व कळतंय.या प्रकरणात पोलिसांना पूर्णपणे फ्री हॅन्ड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठिमागे आहे असं सांगायला पाहिजे. पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. पण ती फक्त गृहमंत्र्यांचीच नाही तर मुख्यमंत्र्यांचीही जबाबदार आहे, असं स्पष्ट मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
"योग्य अधिकारी कोण आहेत. हे पोलीस कमिशनर, डिजी यांना सगळं माहिती असतं. ते कोणाला घ्यायच नाही हे करतात पण, त्यांच्यावर जर आपण दबाव आणला तर ते कसं काम करणार?, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.