मुंबई, दि. 2 - उद्या दिल्लीत होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रीपद मिळणार का ? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आम्हाला प्रसारमाध्यमांकडून कळले. आम्हाला कोणाचाही फोन आला नाही. आम्ही सत्तेसाठी लालची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवसेनेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. सर्वांच लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. पण आमचे लक्ष मात्र मुंबईकरांच्या आरोग्याकडे आहे असे ते म्हणाले.
चार दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे. कारण मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याविषयी बोलताना उद्धव म्हणाले की, मुंबईकर अडचणीत असताना शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन मदत केली. अनेकांची शिवसेना शाखेमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. नालेसफाई नीट झाली नसल्याने मुंबईत पाणी तुंबल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर उद्धव यांनी नालेसफाईत घोटाळा करणा-यांना फासावर लटकवा असे म्हटले आहे.
पावसानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली, त्याची जबाबदारी अन्य संस्था घेणार की नाही ? असा सवाल त्यांनी विचारला. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्वावर गेली 50 वर्ष आम्ही काम करत आहोत असे उद्धव म्हणाले.
शिवसेना अंधारात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला अंधारात ठेऊनच विस्तार होत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.
मोदी मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्री असलेले अनंत गिते हे शिवसेनेचे एकमेव सदस्य आहेत. किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे द्यावीत, अशी शिवसेनेची सुरुवातीपासूनची मागणी आहे. शिवसेनेचे खा.अनिल देसाई यांना पूर्वी राज्यमंत्री पद देऊ करण्यात आले होते. तथापि, ‘आम्हाला दुसरेही कॅबिनेट मंत्रीपदच हवे’अशी भूमिका शिवसेनेने घेतली. तेव्हापासून एकाच कॅबिनेट मंत्रीपदावर ते शिवसेना लटकली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेशीच नव्हे तर जुन्या कोणत्याही मित्र पक्षाशी अद्याप भाजपने विचारविनिमय केलेला नाही. अण्णाद्रमुक, जदयुसारख्या नव्या नवरीस हळद लावण्याचे काम सुरू आहे, या शब्दात शिवसेनेच्या एका ज्येष्ठ खासदाराने नाराजी व्यक्त केली.