राज्यातील एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज पार पडले. यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. त्यामुळे त्यांना वाटले आमच्याकडे एखादे खाते त्यांना हवे आहे, तर आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडे एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते घेऊ. तसेच, पुढचा विस्तार केव्हा करायचा, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. ते योग्य वेळ पाहून ठरवतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री मिळालेल्या खात्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू. सध्या आमचे मंत्रीमंडळ अर्ध्यापेक्षाही छोटे आहे. यामुळे अधिक भार आमच्यावर आहे. लवकरच पुन्हा आमचा विस्तार होईल. तेव्हा यातील काही खाती आमच्या सहकाऱ्यांकडे जातील. तोवर, ज्यांच्याकडे जी खाती आली आहेत त्यांना संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते."
तसेच, "सध्या जी अधिकची खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि जी आमच्याकडे आहेत. ती साधारणपणे त्यात्या पक्षांकडेच असतात. पण, अगदीच तसेच नाही, त्यांना वाटले आमच्याकडे एखादे खाते त्यांना हवे आहे, तर आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडे एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते घेऊ. आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत. त्या दृष्टीने, सध्या तरी असे वाटते, की पुढील विस्तारात त्यांच्याकडची खाती ते त्यांच्या लोकांना देतील आणि आमच्याकडची खाती आम्ही आमच्या लोकांना मिळतील. मात्र, त्यात काही बदल करायचा असेल, तर तसे आम्ही बसून करू शकतो."
यावेळी, पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार? असे विचारले असता, फडणवीस म्हणाले, पुढचा विस्तार केव्हा करायचा, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. ते योग्यवेळ पाहून ठरवतील.