Raosaheb Danve : उद्या, म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाबाबत नेत्यांसह राज्यातील कोट्यवधी मतदारांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीये. अशा परिस्थितीत अपक्ष किंवा लहान पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अपक्षांची संख्या निर्णायक ठरल्यास महायुती आणि मविआ त्यांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करेल. या सर्व परिस्थितीवर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक विधान केले आहे.
लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, आता परिस्थिथी वेगळी आहे. महायुताला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, त्यामुळे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार, यात शंका नाही. आम्ही बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, त्यामुळे आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही. पण, आम्हाला बहुमत मिळाल्यानंतर अपक्षांना आमच्यासोबत यावे वाटले, तर त्यांचा स्वीकार करू. आम्ही बहुमतात येत असल्यामुळे बंडखोरांशी चर्चा करण्याची गरज नाही. बंडखोर हा विषय सत्ता स्थापन झाल्यानंतरचा आहे, अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली.
दरम्यान, यावेळी दानवेंनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपवाले गौतम अदानी यांनाही मुख्यमंत्री करतील, असा टोला राऊतांनी लगावला होता. त्यावर बोलताना दानवे म्हणाले, संजय राऊतांना सकाळी काहीतरी बोलल्याशिवाय जेवण जात नाहीत. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचे बोलणे राजकीय परिपक्वतेचे नाही.
आमच्यासाठी राज्यातील निकाल चांगला असेल. वाढलेल्या मतदानाचा टक्का महिलांचा आहे. महिलांची मते आम्हालाच मिळाली आहेत. लाडकी बहिण आमच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टीला कुठेही नुकसान नाही. भाजपला ना मराठवाड्यात, ना विदर्भ...कुठेही नुकसान होणार नाही. लोकसभेपेक्षा परिस्थिती सुधारल्यामुळे आम्ही बहुमताने निवडून येऊ. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत आणि पुढेही भाजप-राष्ट्रवादीसोबत राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते काहीही बोलले तरी त्याला काही अर्थ नाही. जो मुख्यमंत्री यांचा निर्णय तोच कार्यकर्त्यांचा निर्णय असेल, असेही दानवेंनी स्पष्ट केले.