मुंबई - राज्यात एकीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद वाढत असतानाच दुसरीकडे ओबीसी मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांनी आरक्षण सोडण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही सक्षम झालो आता आम्हाला आरक्षण सोडायला हवं. यातून समाजातील अशा लोकांना फायदा होईल जे आजपर्यंत आरक्षणापासून वंचित आहेत असं ओबीसी मेडिको असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल घुले यांनी सांगत आरक्षण सोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
डॉ. राहुल घुले म्हणाले की, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रगतशील महाराष्ट्रात आरक्षणामुळे जातीय द्वेष वाढत आहे. सध्या मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून वाद सुरू आहे. आरक्षणाचा लाभ मिळाल्याने आजपर्यंत अनेक लोक सक्षम झालेत. ज्यांची प्रगती झाली अशा लोकांनी आरक्षणाचा त्याग केला तरच समाजातील वंचित घटकांना त्याचा फायदा होऊ शकेल. आम्ही १५-२० सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ओबीसी आरक्षण त्याग करत असल्याचं प्रतिज्ञापत्र देणार आहोत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मदिवशी २६ जूनपासून आरक्षण सोडा, समाज जोडा या अभियानाची सुरूवात करणार आहोत. समाजातील अशा प्रतिष्ठित आणि सक्षम झालेल्या लोकांना आम्ही स्वच्छेने आरक्षणाचा त्याग करावा यासाठी प्रयत्न करणार. आरक्षण सोडण्यासाठी कुणावरही दबाव नाही, त्यांनी मनापासून आरक्षणाचा त्याग केला पाहिजे ज्यातून एखाद्या गरिब कुटुंबाला त्याचा लाभ मिळेल असंही डॉ. राहुल घुले यांनी म्हटलं.
दरम्यान, समाजातील गरिब कुटुंबाला, त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबाने आरक्षणाचा त्याग केला पाहिजे. आम्हाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला. त्यातून आज आम्ही एमबीबीएस डॉक्टर बनलो. आता आमची आर्थिक स्थिती सुधारली आहे. आम्ही आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवू शकतो. त्यामुळे आमच्या मुलांना आरक्षणाची आवश्यकता नाही असंही घुले यांनी स्पष्ट सांगितले.
आरक्षण सोडा, समाज जोडा अभियान
येणाऱ्या काळात आरक्षण सोडा, समाज जोडा हे अभियान राज्यभरात राबवलं जाणार आहे. त्यासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, कोल्हापूर, ठाणे याठिकाणी समाजातील लोकांसोबत विचारमंथन आयोजित करण्यात आल्याची माहिती ओबीसी मेडिको असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अतुल गिरी यांनी सांगितले.