नागपूर - भारत हा अहिंसेचा पुजारी आहे, दुर्बलतेचा नाही. भारताच्या मनात अहिंसा आणि हातात शक्ती आहे. अमेरिका, चिन यांसारख्या शक्तीशाली राष्ट्रांना जगावर राज्य करायचे आहे. परंतु, भारताचा तो स्वभावधर्म नाही. साम्राज्यवादी हिंदूस्थान आपल्याला घडवायचा नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
काही इतिहासकार भारताचा इतिहास २४०० वर्षांचा असल्याचे मानतात. वास्तवात भारताचा इतिहास नऊ हजार वर्षांहून जुना आहे. भविष्यात भारताचा खरा इतिहास पाठ्यापुस्तकातही येईल आणि हे परिवर्तन होईस्तोवर प्रतिक्षा न करता प्रत्येक युवकाने भारताला मोठे करण्यासाठीच्या कार्यात आपले योगदान द्यावे. भारत हा ज्ञानसंपन्न असून संपूर्ण विश्वाच्या अस्तित्तवाची एकता मानणारा आहे आणि याच विचारांचा अंगीकार करत प्रत्येक युवकाने आपले कार्य उत्कृष्ट पद्धतीने आणि कुशलनेते करायचे आहे. अखंड भारताचा जप करताना काही लोक घाबरतात आणि कधी होणार, असा सवाल उपस्थित करतात. आपण घाबरणे सोडून देऊ तर भारत अखंड होणारच आहे.
देशाच्या उणिवा दाखविण्यात रस असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या हातात मायक्रोफोन असल्याने त्यांचा आवाज जास्त होतो. परंतु, सकारात्मकता पसरवणारे लोक त्याहून अधिक आहेत. आम्हाला आमच्यातील प्रांत, भाषा, जाती, पंथ, संप्रदाय, धर्म आणि सांस्कृतिक भेदांना विसरून या देशाचा स्वभाव लक्षात घेण्याची गरज आहे. या देशाच्या स्वभावानुसार आम्हाला आमचा स्वभाव बनवावा लागेल. व्यक्ती आणि देशाचा स्वभाव सारखा झाला तरच देशाला आपले लक्ष्य गाठता येईल. देशाच्या सेवेत असलेल्या निस्वार्थी लोकांची ओळख पटवून त्यांना साथ दिली पाहिजे. त्यासाठी नकली व्यक्ती आणि संघटनांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. भागवत यावेळी म्हणाले.
घर आणि कुटुंबानंतर आपल्या समाजासाठी आवर्जुन वेळ काढला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाची लढाई वेगवेगळ्या तऱ्हेची असली तरी ती एका दिशेने हवी. संकट आले की संपूर्ण देश एकजूट होतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पण संकट येऊच नये यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत असेही भागवत यावेळी म्हणाले.