Eknath Shinde : आगामा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार सातत्याने आपल्या कामांचा पाढा वाचत आहेत. दरम्यान, आज(दि.25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते दिल्लीवारी आणि आगामी निवडणुकीची रणनीती...अशा विविध विषयांवर भाष्य केले.
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण
राज्यातील सरकार दिल्लीतून चालवले जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करत आहेत. या आरोपाबाबत सीएम शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दिल्लीला जातो, ते महाराष्ट्राच्या विकासासाठी. दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्रासाठी काहीतरी घेऊन येतो. मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्ही दिल्लीत जात नाही. दिल्लीत जाऊन आम्ही रेल्वे, रस्ते, सिंचन, शहरी विकासाचे प्रस्ताव आणतो. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असेल, तर त्याचा फायदा होतो आणि महाराष्ट्रालाही त्याचा फायदा झाला आहे. वाधवन बंदरात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी राज्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. राज्यात सेमी कंडक्टर कंपनी येत आहे, नवी मुंबईत विमानतळ बांधले जात आहे. विरोधक आम्हाला याचे कधीच श्रेय देणार नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत की, तीन चाकी इंजिन आहे? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही एक टीम म्हणून काम करतो, खुर्चीचा लोभ नाही. भविष्यातही आम्ही एक टीम म्हणून काम करू. महिलांसाठी सुरु केलेली रोख लाभ योजना कोणाची आहे? ही अजित पवार लाडकी बहीण योजना आहे, देवेंद्र फडणवीस लाडकी बीण योजना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही तिघांनीही एक टीम म्हणून एकत्र काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवानंतर लाडकी बहीण योजनेची गरज का भासली? या प्रश्नावर ते म्हणाले की, या योजनेची तयारी दीड वर्षापासून सुरू होती. कोणतीही योजना अचानक येत नाही. आमचे सरकार गरिबांचे सरकार आहे, आम्ही गरिबी पाहिली आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना आणि बेरोजगारांना स्टायपेंड देत आहोत, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काय फरक पडला? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणताही बदल झालेला नाही. कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. आपल्याला काय मिळेल याचा कधीच विचार केला नाही. जनतेच्या इच्छेनुसार मी काम करत राहिलो आणि मुख्यमंत्रीपद मिळाले. आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जागावाटपाच्या प्रश्नावर कोणतीही अडचण नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.